Pune News | नदीपात्रातील अतिक्रमणावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; तबेले आणि घोडागाड्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी – संदीप खर्डेकर
Pune News | पुण्यातील बाबा भिडे पूल ते राजपूत वीट भट्टी दरम्यानच्या नदीपात्रातील रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याचा आरोप होत असून, तक्रारीनंतर केवळ तोंडदेखली कारवाई केली जाते आणि काही दिवसांत परिस्थिती पूर्ववत होत असल्याची नागरिकांची भावना आहे.
बाबा भिडे पुलाजवळील खाद्यपदार्थांच्या चौपाटी परिसरात सुमारे २० घोडागाड्या उभ्या राहत असून पुलाखाली तबेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथे घोडे बांधले जात असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र लिहून या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे. अतिक्रमणाबाबत पुणेकरांच्या भावना तीव्र असून प्रशासनाने केवळ दिखाऊ कारवाई न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
