El Nino Update | 1950 नंतरचा सर्वात भीषण ‘एल निनो’ सक्रिय; मान्सूनवर संकट, दुष्काळाचे सावट गडद?
मुंबई : El Nino Update | प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेच्या हवामानशास्त्र संस्थेच्या (NOAA) क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर (CPC) ने केली आहे. यंदाचा एल निनो १९५० नंतरचा सर्वाधिक तीव्र ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, डिसेंबरपर्यंत त्याचे स्वरूप अतितीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सीपीसीच्या ताज्या अंदाजानुसार, गेल्या महिनाभरात प्रशांत महासागरातील तापमानात झालेल्या बदलांमुळे एल निनोची स्थिती विकसित झाली आहे. विशेष म्हणजे, २०२७ च्या पूर्वार्धापर्यंतही एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह देशातील पावसावर परिणाम होण्याची शक्यता
हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांच्या मते, एल निनोची तीव्रता येत्या काही महिन्यांत वाढत जाणार असून डिसेंबरपर्यंत ती सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकते. त्यामुळे यंदाचा संपूर्ण मान्सून हंगाम एल निनोच्या प्रभावाखाली राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तीव्र एल निनोच्या काळात भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वाढते. भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा देशात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण आणखी कमी झाल्यास दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
डिसेंबरमध्ये अतितीव्र रूप धारण करण्याचा अंदाज
तज्ज्ञांच्या मते, एल निनोच्या अतितीव्र अवस्थेत प्रशांत महासागरातील तापमान सरासरीपेक्षा दोन ते अडीच अंशांनी वाढू शकते. त्यामुळे १९५० पासूनच्या नोंदींमध्ये यंदाचा एल निनो सर्वाधिक प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मान्सूनच्या प्रगतीत अडथळे
प्रभुणे यांच्या म्हणण्यानुसार, मेडन-ज्युलियन ऑसिलेशन (MJO) हा मान्सूनच्या सक्रियतेसाठी महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून एमजेओ भारतीय उपखंडावर सक्रिय नसून प्रशांत महासागराच्या परिसरातच केंद्रित राहिला आहे. याशिवाय आखाती देशांकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळेही मान्सूनच्या प्रगतीला अडथळे निर्माण होत आहेत.
दुष्काळाचा धोका वाढणार?
एल निनोचा प्रभाव जुलै-ऑगस्टमधील मान्सूनच्या सक्रिय आणि विश्रांतीच्या कालखंडांवरही पडण्याची शक्यता आहे. परिणामी, कमी पावसाचा फटका विशेषतः आधीच कमी पर्जन्यमान असलेल्या भागांना बसू शकतो. त्यामुळे काही प्रदेशांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
