Pune Crime News | 6 वर्षे मुले शिकली, परीक्षा दिल्या पास झाले, हे कनिष्ठ महाविद्यालये बनावट मान्यतापत्रावर सुरु असल्याचे झाले उघड, ओम साई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व स्वामी विवेकानंद ज्यु़ कॉलेजच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | पाथर्डी येथील ओम साई बहुउद्देशीय संस्था चालवित असलेले विमाननगर आणि हडपसर येथील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज यांना शासनाची मान्यता नसताना त्या दुसर्या संस्थेला दिलेल्या मान्यतापत्राचे बनावट मान्यतापत्र तयार करुन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील सहायक शिक्षण उपनिरीक्षक पद्या शेषराव दिंडे (वय ४१, रा. हडपसर) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ओम साई बहुउद्देशीय संस्था पाथडी (Om Sai Multipurpose Institution Pathadi) या शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, तसेच स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज विमाननगर Swami Vivekananda Junior College, Viman Nagar (इन्सापायर कॉलेज – Inspire College) व हडपसर (एपीके कॉलेज – APK College) यांचे तत्कालीन मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१९ ते २०२६ पर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील ओम साई बहुउद्देशीय संस्थेच्या स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज विमाननगर व स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, हडपसर या दोन कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मध्ये ११ वी प्रवेश प्रक्रिया कशी झाली, याबाबत तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार या दोन्ही कॉलेजला त्यांनी भेटी दिल्या. त्यांनी शासन मान्यता पत्र सादर केले. त्यांनी २० सप्टेंबर २०१९चा शासन निर्णय पाहिला. तो रंभा लक्ष्मी बहुउद्देशीय संस्था, मेहरुन जि. जळगाव, या शाळेस इयत्ता ११ वी व १२ वी मराठी माध्यम सर्व शाखा राज्य मंडळासाठी मान्यता दिली होती. या संदर्भाचा उपयोग करुन स्वत:च्या संस्थेचे कॉलेजला ११ वी व १२ वी इंग्रजी माध्यम, राज्य मंडळ सर्व शाखा २०१९ – २०२० या शैक्षणिक वर्षापासून मान्यता देण्यास शासन परवानगी देण्यात येत आहे, असे बनावट मान्यतापत्र तयार केले.
तसेच १९ सप्टेंबर २०१९ चे खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळ खराबवाडी, चाकण ता. खेड, संचलित नव महाराष्ट इंग्लिश मिडियम स्कुल खराबवाडी, या शाळेस इयत्ता १ ली ते १० वी इंग्रजी माध्यम सर्व शाखा, राज्य मंडळासाठी मान्यता देण्यात आली होती. या संदर्भाचा उपयोग करुन ११वी व १२ वी इंग्रजी माध्यम राज्य मंडळ सर्व शाखा २०१९ -२०२० या शैक्षणिक वर्षापासून मान्यता देण्यास शासन परवानगी देण्यात येत आहे, असे बनावट मान्यतापत्र तयार करुन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची तसेच ११ वी व १२ वी मध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची फसवणुक केली आहे. दोन्ही ज्युनिअर कॉलेज हे बनावट मान्यता पत्राचा वापर करुन सुरु होते. या कॉलेजमधून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी परीक्षा देऊन पास झाले. त्यानंतर आता शिक्षण विभागाला हा फसवणूकीचा प्रकार लक्षात आला आहे. पोलीस निरीक्षक मोरे तपास करीत आहेत.
