Sandeep Khardekar | एसएनडीटी मेट्रो स्थानकातील पार्किंग अव्यवस्थेमुळे नागरिक त्रस्त; पाहणी दौऱ्याची आणि उपाययोजनांची क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्याकडून मागणी
Sandeep Khardekar | पुण्यातील कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी मेट्रो स्थानक परिसरातील पार्किंगच्या वाढत्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानक उभारताना वाहनतळाच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरातील अरुंद कॅनॉल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठवून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू वसाहत, विविध व्यावसायिक आस्थापने, शाळा तसेच करिष्मा सोसायटीपर्यंत जाणारी वाहतूक यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
मेट्रो प्रवाशांकडून आता पांडुरंग कॉलनीतही वाहने पार्क केली जात असल्याने भविष्यात ही समस्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. स्थानकाखालील रिक्षा स्टँड आणि पीएमपीएमएल बस थांब्यामुळे वाहतुकीवरील ताण वाढत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांसह संयुक्त पाहणी दौरा आयोजित करून नागरिकांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. समस्या कायम राहिल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
