Pune Crime News | सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून खंडणी विरोधी पथकाने जप्त केले एक पिस्टल, दोन काडतुसे
पुणे : Pune Crime News | गँगस्टर बंडु आंदेकर, सोमनाथ गायकवाड व सुरज ठोंबरे या टोळ्यांमध्ये पुन्हा टोळीयुद्ध सुरु झाल्याने पोलिसांचे त्यांच्यावर लक्ष असताना सराईत गुन्हेगार कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याच्या बातमीवरुन खंडणी विरोधी पथकाने सुरज ठोंबरेच्या टोळीतील गुंडाला पकडून त्यांच्याकडून एक पिस्टल, २ काडतुसे जप्त केली आहे.
आकाश ऊर्फ स्काय मंगेश सासवडे Akash alias Sky Mangesh Sasvade (वय २७, रा. पंतप्रधान आवास योजना सोसायटी, नांदेड सिटी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. आकाश सासवडे याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात ३ गुन्हे असून बंडगार्डन, फरासखाना येथे प्रत्येकी एक गुन्हे दाखल आहेत. तसेच चॅप्टर केस, मोका, तडीपार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
गँगस्टर बंडु आंदेकर, सोमनाथ गायकवाड व सुरज ठोंबरे या टोळ्यांमध्ये सध्या टोळीयुद्ध सुरु झाले आहे. त्यामुळे या टोळ्यांमधील गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे व त्यांच्याकडून पुन्हा कोणताही गंभीर गुन्हा घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी़ तसेच ते कोणाताही गुन्हा करणार नाहीत, याबाबत माहिती काढून कार्यवाही करावी, असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक, युनिट २, समर्थ पोलीस हे १० जून रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अमोल आवाड यांना बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, एक जण देशी बनावटीचे पिस्तुल कंबरेला लावून नांदेड सिटी चुल आंगण हॉटेलच्या परिसरात फिरत आहे. मिळालेली बातमी पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे, युनिट २ च्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना सांगितली. त्यांच्या आदेशानुसार, सर्व पोलीस पथक तेथे पोहचले. त्यांनी आकाश सासवडे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूस कमरेला पॅन्ट मध्ये खोचून ठेवलेले एक सिल्व्हर रंगाचे पिस्तुल व त्याचे मॅगझीनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने हे पिस्तुल मित्राकडून घेतल्याचे सांगितले.
ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, युनिट २ च्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे तसेच सहायक पोलीस निरीक्षक धीरज राऊत, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार फडतरे, आवाड, दांगडे, कांबळे, इम्रान शेख, जगताप, यादव यांनी केली आहे.
