Patit Pawan Sanghatana | पुणे शहरातील गुटखा माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा व तसेच पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) स्वतंत्र, सुसज्ज आणि नागरिकांना सहज उपलब्ध होईल असे सक्षम कार्यालय सुरू करण्यात यावे;  पतित पावन संघटना स्वप्निल नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Patit Pavan Sanghatana | Swapnil Naik of the Patit Pavan Sanghatana has demanded that the District Collector take action under the MCOCA (Maharashtra Control of Organised Crime Act) against gutkha mafias in Pune city and establish a dedicated, well-equipped, and easily accessible office for the Food and Drug Administration (FDA) in the city.

पुणे : Patit Pawan Sanghatana | महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही पुणे शहरात अनेक ठिकाणी खुलेआम गुटखा, पानमसाला व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असून यामागे संघटित गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असल्याचा गंभीर आरोप पतित पावन संघटनेने केला आहे.

या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून गुटखा विक्रेते, साठेबाज, वाहतूकदार, वितरक आणि या अवैध व्यवसायाचे मुख्य सूत्रधार यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का – MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गुटखा विक्री ही केवळ किरकोळ विक्रेत्यांपुरती मर्यादित नसून त्यामागे मोठे आर्थिक रॅकेट कार्यरत आहे. शासनाने बंदी घातलेली असतानाही पुणे शहरात सर्रास गुटखा उपलब्ध होत असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. युवकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या अवैध व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबवून संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे.

तसेच पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) स्वतंत्र, सुसज्ज आणि नागरिकांना सहज उपलब्ध होईल असे सक्षम कार्यालय सुरू करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे व इतर जनहिताच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन व तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

स्वप्निल नाईक यांनी सांगितले की, “गुटखा माफियांमुळे युवकांचे आरोग्य धोक्यात आले असून शासनाच्या आदेशांची उघडपणे पायमल्ली होत आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून उपयोग नाही. या व्यवसायामागील मुख्य सूत्रधार आणि आर्थिक लाभार्थ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे.”

प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई न केल्यास सामाजिक संघटनांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाचे कार्याध्यक्ष श्री स्वप्निल नाईक, उपाध्यक्ष श्री प्रवीण झंवर, पुणे शहराध्यक्ष मनोज पवार, पुणे शहर सरचिटणीस गुरु कोळी, पुणे शहर कार्याध्यक्ष संतोष शेंडगे, पुणे शहर उपाध्यक्ष विराज सांगळे, अशोक परदेशी, अजय कवठे, पुणे शहर संपर्कप्रमुख स्वप्निल आंग्रे, पुणे शहर सह संपर्कप्रमुख शशिकांत तोडकर यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते

You may have missed