Pune News | तीन वर्षांपासून रखडलेले आदिवासी वसतिगृह; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, आंदोलनाचा इशारा
पुणे : Pune News | पुणे महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून विश्रांतवाडी परिसरातील हवलदार मळा, सुरभी टाऊनशिपजवळील महापालिकेच्या जागेवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची भव्य इमारत उभारली आहे. मात्र, इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही गेल्या तीन वर्षांपासून वसतिगृह सुरू न झाल्याने ही इमारत वापराविना पडून असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
माहितीनुसार, २०२५ च्या अर्थसंकल्पात तसेच २०२६ मध्येही या वसतिगृहासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. जानेवारी २०२६ मध्ये वसतिगृह सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती, परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्यापही ते सुरू झालेले नाही.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सध्या ही इमारत असामाजिक घटकांचा अड्डा बनली असून येथे मद्यपान, मटण पार्ट्या तसेच अन्य गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. विशेष म्हणजे, या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षक अथवा महापालिकेचा कर्मचारी नियुक्त नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
या इमारतीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर विश्रांतवाडी येथील दगडी खाण असल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. दुर्लक्षित अवस्थेमुळे येथे कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेत अनुसूचित जमाती (एसटी) समाजाचे दोन नगरसेवक निवडून आले असून ते सत्ताधारी पक्षाशी संबंधित असतानाही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हे वसतिगृह सुरू झाल्यास महाराष्ट्राच्या विविध भागांतून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन वसतिगृह सुरू करण्याबाबत कार्यवाही न केल्यास प्रदीप रावते फाउंडेशनच्या वतीने पुणे महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
