Gangapur Accident News | शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्यांवर काळाचा घाला; कंटेनरने दुचाकीला फरफटत नेल्याने ३० वर्षीय डॉक्टरसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
गंगापूर : Gangapur Accident News | शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या दुचाकीस्वारांना शनिवारी (ता. १३) सकाळी भीषण अपघातात जीव गमवावा लागला. गंगापूर-भेंडाळा फाटा-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बाबरगाव फाट्याजवळ कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण धडकेत ३० वर्षीय डॉक्टरसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोघांसह कंटेनर चालकाचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरकडून भेंडाळा फाटा-गंगापूर मार्गे शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या स्कुटी (एमएच २० : एचयू ४४०७) ला समोरून येणाऱ्या कंटेनरने (केए ५६ : ८७६८) जोरदार धडक दिली. धडकेनंतर कंटेनरने दुचाकीला सुमारे पाऊण किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याने दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. त्यानंतर कंटेनर पलटी होऊन त्याचेही मोठे नुकसान झाले.
या भीषण अपघातात जालना येथील डॉ. महादेव चंद्रकांत घुले (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या मीरा कडूबा पांडव (वय २३, रा. गुंडेवाडी, जि. जालना) या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि सागर शेजूळ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मीरा पांडव यांचीही प्राणज्योत मालवली.
दरम्यान, हैदराबादकडे माल घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा चालक राजकुमार देवेंद्र अप्पा (वय ४६, रा. मंगलगी, जि. बिदर, कर्नाटक) यांचाही अपघातात मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांचे रिझवान शेख, प्रकाश सातपुते आणि विष्णू बापते यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
