Pune Water Crisis | पुणे : खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा घटला; पुण्यावर पाणीटंचाईचे संकट गडद
पुणे : Pune Water Crisis | पुणे शहरासह जिल्ह्यातील शेतीला जीवनदायी ठरणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात यंदा चिंताजनक घट नोंदवली गेली आहे. त्यातच एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग मंदावल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये सध्या एकूण ४.३१ टीएमसी म्हणजेच १४.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५.२० टीएमसी (१७.८४ टक्के) होता. त्यामुळे यंदा धरणसाखळीत जवळपास एक टीएमसीने कमी पाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात नव्या पाण्याची आवक वाढलेली नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते, एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून त्याचा परिणाम जलसाठ्यांवर दिसून येत आहे.
पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होऊन धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. मात्र, पावसाने दडी मारल्यास पुणे जिल्ह्यावर संभाव्य पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
दुष्काळात वाढत्या अतिक्रमणांचा जलसाठ्यांवर ताण
दरम्यान, खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर शहरीकरण, पर्यटन व्यवसाय, फार्महाऊस आणि विविध बांधकामांमध्ये वाढ झाली आहे. कमी पाऊस, वाढती पाण्याची मागणी आणि एल निनोचा प्रभाव यामुळे धरणांवरील ताण आणखी वाढला असून, आगामी काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
