Bhimashankar Temple | भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी ऑनलाइन पास अनिवार्य; दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश

Bhimashankar Temple

पुणे : Bhimashankar Temple | श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आज (सोमवार) पासून भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले असून, दररोज केवळ 1 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाइन नोंदणी करून पास घेणे अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

भाविकांना मंदिर व्यवस्थापन समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतरच दर्शनाचा पास उपलब्ध होणार आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या नोंदणीकृत यादीतील भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार असून, दर्शनासाठी पास सक्तीचा करण्यात आला आहे.

30 जून 2026 पर्यंत भाविकांना दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांनी मंदिरात येताना वैध ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि प्रयागराज महाकुंभ 2025 च्या अनुभवाच्या आधारे भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनाची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.

मुख्य सभामंडपाचे काम पूर्ण झाले असून दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि गर्दी नियंत्रणासाठीची पायाभूत कामे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित किरकोळ कामे पूर्ण करून बांधकाम साहित्य आणि यंत्रसामग्री हटविण्याची प्रक्रिया सुरू असून, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टने आजपासून मंदिर दर्शनासाठी खुले केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

You may have missed