Pune Crime News | वडकीनाला येथे पिस्टल घेऊन फिरणार्या दोघांना पकडून फुरसुंगी पोलिसांनी जप्त केले गावठी पिस्टल
पुणे : Pune Crime News | वडकी नाला येथील मोकळया जागेत थांबलेल्या दोघा जणांना फुरसुंगी पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे.
आदेश आत्माराम काळे Aadesh Atmaram Kale (वय २०, रा. काळेवाडी, पो. दिवे, ता. पुरंदर) आणि अजय बाळासाहेब साबळे Ajay Balasaheb Sable (वय ३०, रा. साबळे मळा, वडकीनाला) अशी अटक केलेल्यांची नाव आहे.
याबाबत पोलीस अंमलदार हेमंत शरदचंद्र कामथे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अंमलदार १३ जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत होते. गस्त घालत ते रात्री साडेनऊ वाजता वडकी नाला येथील पालखी विसावा येथे आले होते. तेथे फिर्यादी व पोलीस हवालदार गायकवाड यांना त्यांच्या बातमीदारांनी बातमी दिली की, दिवे घाट पायथा येथील महालक्ष्मी प्लॉटिंग येथील मोकळ्या जागेत दोघे जण थांबले आहे. त्यांच्यातील एकाच्या कमरेला गावठी पिस्टलसारखे अग्निशस्त्र आहे. ही खात्रीशीर बातमी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना कळविली. त्यानंतर पोलीस पथक तेथे पोहचले. त्यावेळी तेथे दोघे जण थांबलेले दिसून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता आदेश काळे याच्या ट्रॅक पॅन्टच्या आतील बाजूस एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅग्झीनसह मिळून आले. पिस्टलबाबत विचारपुस केल्यावर त्याने हे पिस्टल अजय साबळे याचे असल्याचे सांगितले. अजय साबळे याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे तपास करीत आहेत.
