Pune Crime News | कुत्रा चावल्याच्या रागातून तरुणाने डोक्यात दगड घालून कुत्र्याला जीवे मारले; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  घराबाहेर ठेवलेला कुत्रा चावल्याच्या रागातून तरुणाने कुत्र्याच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे ठार मारले. खडकी पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जीवन भीमसेन सोनवणे (वय ५२, रा. वसुधा इक्वीनॉक्स शेजारी, तेली चाळ, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आलम शेख (वय २७, रा. तेली चाह, बोपोडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना १५ जून रोजी पहाटे सव्वाचार वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जीवन सोनवणे यांचा मित्र पियुश बनकर यांच्या सोसायटीमध्ये कुत्रे पाळण्यास मनाई आहे. त्यामुळे त्याने त्याच्याकडे असलेला ऑगी हा पॉमेलियन कुत्रा सोनवणे यांच्याकडे दिला होता. तो सोनवणे यांच्या घराबाहेरच राहत असतो. सोसायटीमध्ये क्रिकेट खेळत असताना आलम शेख याने ऑगीला बॅट मारली होती. त्यामुळे एके दिवशी ऑगीने आलमचा चावा घेतला होता. १५ जून रोजी रात्री १ वाजेपर्यंत ऑगी कुत्रा सोनवणे यांच्याबरोबर होता. ते घरी झोपलेले असताना त्यांच्या घरासमोर राहणारी शितल नाटेकर हिने फोन करुन सांगितले की, तुमच्या घराचे समोर तुमचा डॉग जखमी अवस्थेत आहे. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता ऑगी जखमी अवस्थेत दिसत होता.

त्याच्या उजव्या कानाच्या खाली जमिनीवर रक्त जमा झालेले दिसत होते. त्याला अपघात झाला असेल असे समजून त्याचा अंत्यविधी करुन ते आपापल्या कामाला निघून गेले. त्यांच्या सोसायटीच्या शेजारी असलेले वसुधा इक्वीनटस याच्या कार्यालयात ते ऑगीचे काय झाले हे आपण सीसीटीव्हीमध्ये पाहु असे म्हणून तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात गोपी हेअर ड्रेसर याचा मालक आलम शेख हा दगड घेऊन जात असल्याचे पाहिले. त्यामुळे ते पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. तेव्हा पोलिसांना आलम शेख याने ऑगी मला चावला होता, त्यामुळे मी त्याच्या डोक्यात दगड घालून त्यास मारले, असे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करीत आहेत.

You may have missed