Shirur Pune Crime News | पुणे : शेतातील काम सांगितल्याचा राग अनावर; नातवाकडून 84 वर्षीय आजोबांची हत्या, शिरूर तालुक्यात खळबळ

Shirur Pune Crime News | Pune: Grandson kills 84-year-old grandfather in a fit of rage over being asked to do farm work; incident causes a stir in Shirur Taluka.

पुणे : Shirur Pune Crime News |  पावसापूर्वी शेतातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा सल्ला दिल्याच्या रागातून 26 वर्षीय नातवाने आपल्या 84 वर्षीय आजोबांची लोखंडी गजाने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी आरोपी सोमनाथ राऊत (वय 26) याला अटक केली आहे.

याप्रकरणी मृत दशरथ यशवंत राऊत (वय 84) यांचे पुत्र दुर्योधन दशरथ राऊत यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास राऊत कुटुंबाच्या राहत्या घरी ही घटना घडली. दशरथ राऊत हे नातू सोमनाथ याला शेतातील कामकाजाबाबत सूचना देत होते. मात्र, या गोष्टीचा राग मनात धरून सोमनाथने लोखंडी गजाने आजोबांच्या डोक्यावर आणि पाठीवर जोरदार प्रहार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दशरथ राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्यानंतर अल्पावधीतच आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत असून, किरकोळ कारणावरून नातवानेच आजोबांचा जीव घेतल्याने बाभुळसर बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

You may have missed