Pune Crime News | पुणे : पिंपळे गुरवमध्ये पार्किंगच्या किरकोळ वादातून तिघांचा संताप अनावर; महिलेला मारहाण, अंगठ्याला फ्रॅक्चर
पुणे : Pune Crime News | पिंपळे गुरव परिसरात गाडी पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, एका ५३ वर्षीय महिलेला आणि तिच्या भाच्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत महिलेचा अंगठा मुरगळल्याने त्याला फ्रॅक्चर होऊन त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी (१४ मे) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.
याप्रकरणी आशा राजुकटराज (वय ५३) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार शिवराज वाघमारे (५६), पत्नी पुष्पा वाघमारे (५४) आणि मुलगा महेश वाघमारे Mahesh Shivraj Waghmare (३५, रा. पिंपळे गुरव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्किंगच्या कारणावरून फिर्यादी आशा राजुकटराज आणि त्यांचा भाचा आशिष यांच्याशी संशयितांचा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर तिघांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी झालेल्या झटापटीत महिलेचा अंगठा जोरात मुरगळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असून पुढील तपास सांगवी पोलिस करत आहेत.
