Katraj Kondhwa Road | पुणे : कात्रज-कोंढवा मार्गावरील वाहतुकीत आजपासून बदल; उड्डाणपुलाच्या कामामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Pune Traffic Updates

पुणे : Katraj Kondhwa Road | कात्रज चौक ते राजस सोसायटीदरम्यान सुरू असलेल्या सहापदरी उड्डाणपुलाच्या ‘सेगमेंट लाँचिंग’च्या कामामुळे कात्रज-कोंढवा मार्गावरील वाहतुकीत आज, १९ जूनपासून पुढील आदेशापर्यंत बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वाहतूक व्यवस्थापनासाठी कोंढव्याकडून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांना राजस सोसायटी पुलाचा वापर न करता शेजारील सर्व्हिस रस्त्याने पुढे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राजस सोसायटी येथील पुलावरील वाहतूक मात्र केवळ कात्रज ते कोंढवा या दिशेने एकेरी स्वरूपात सुरू राहणार आहे.

कात्रज तलावाकडून येणाऱ्या वाहनांनी राजस सोसायटी चौक किंवा कोंढव्याकडे जाण्यासाठी डावीकडे वळून सर्व्हिस रस्त्याने पुढे जाऊन वळसा मारून पुलावरून प्रवास करावा. तसेच, राजस सोसायटीकडून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी कपिला डेअरीजवळून यू-टर्न घेऊन पुढील प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उड्डाणपुलाचे काम सुरक्षित आणि सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

You may have missed