Mumbai Accident News | मुंबई : विलेपार्लेतील भीषण अपघातात विवाहितेचा मृत्यू; इलेक्ट्रिक कारच्या धडकेत 11 वर्षांचा मुलगा मायेला मुकला

Mumbai Accident News | Mumbai: Married woman dies in a horrific accident in Vile Parle; 11-year-old boy loses his mother after being struck by an electric car.

मुंबई : Mumbai Accident News | विलेपार्ले (पूर्व) येथील मोगीबाई मार्केटजवळ इलेक्ट्रिक कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात ४१ वर्षीय किंजल शाह यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांचा ११ वर्षांचा मुलगा परम मायेला मुकला आहे.

गृहिणी असलेल्या किंजल शाह या भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, विलेपार्ले स्टेशन रोड परिसरातील मोगीबाई मार्केटजवळ भरधाव इलेक्ट्रिक कारने पादचाऱ्यांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

किंजल शाह यांचे पती हिरेन शाह यांचा प्लास्टिक वस्तूंचा व्यवसाय असून, कुटुंब वर्षभरापूर्वीच विलेपार्ले परिसरातील नव्या घरात राहायला आले होते. जैन धर्मीय परंपरांचे पालन करणाऱ्या किंजल या नेहमीप्रमाणे घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, काही क्षणांतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ४४ वर्षीय विलास श्रीधर गव्हाणकर चालवत असलेल्या इलेक्ट्रिक कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने वर्दळीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात आणखी तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, चालकाची निष्काळजीपणा कारणीभूत होता की वाहनात काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

You may have missed