Pune Crime News | लग्नासाठी 20 लाख रुपयांचे 160 ग्रॅम सोन्याचे दागिने मागून घेऊन परत करण्यास नकार देणार्‍या वहिनीवर गुन्हा दाखल; वडगाव शेरी येथील घटना

Pune Crime News

पुणे : लग्नात घालण्यासाठी २० लाख रुपयांचे १६० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन तीन वर्षानंतरही परत करण्यास नकार देणार्‍या वहिनीविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दहप्रीत कौर व्हान Dahapreet Kaur Van (वय ३५, रा. अरावली मार्ग, इंदिरानगर, लखनौ, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या वहिनीचे नाव आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील ब्रम्हासन सिटी येथे ८ जुलै २०२३ मध्ये सायंकाळी साडेसहा वाजता घडला होता.

याबाबत साक्षी सौरभ साहनी(वय ४०, रा. ब्राम्हासनसिटी, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांचा भाऊ नवदीपसिंह नरुला व त्याची पत्नी दशप्रीत कौर व्हान यांचे २०१९ मध्ये लग्न झाले आहे. तेव्हापासून ते दोघे त्यांच्याच बिल्डिंगमध्ये रहात आहेत. त्यांचा भाऊ व वहिनी हे त्याच्या घरी नेहमी येत असतात. २०२० मध्ये त्या कामानिमित्त कॅनडा येथे गेल्या होत्या. २ जुलै २०२३ मध्ये त्या परत ब्राम्हासन सिटी येथे  आल्या. त्यानंतर ३ जुलै २०२३ रोजी त्या घरी आल्यामुळे सामान व इतर साहित्य व्यवस्थित लावत होत्या. तेव्हा त्यांचे भाऊ व वहिनी हे घरी आले होते. त्यांनी त्याचे सोन्याचे दागिने वहिनीने पाहिले. वहिनी म्हणाली की मला लग्नाला जायचे आहे, तुमचे सोन्याचे दागिने मला द्या. त्यानंतर ८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वहिनी घरी आली. तिने दागिने मागितले. त्यावेळी फिर्यादी यांनी सोन्याचे २ पीस नेकलेस, डायमंडचे १ पीस नेकलेस, सोन्याचे ६ पीस कानातील झुमके, सोन्याचे २ बांगड्या, असे सोन्याचे दागिने एकूण वजन अंदाजे १६० ग्रॅम वजनाचे अंदाजे किंमत २० लाख रुपयांचे दागिने वहिनी दशप्रीत कौर व्हान हिला दिले. त्यानंतर ९ ऑक्टोंबर २०२३ रोजी वहिनी ही लखनौ येथे जाणार असल्याने फिर्यादी यांनी माझे दागिने परत दे, असे म्हणाल्या, त्यावर दशप्रीत कौर हिने मला आता वेळ नाही, मी परत आल्यावर दागिने परत देते.

त्यानंतर त्या १० नोव्हेंबर २०२३ रोजी लखनौला गेल्या होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गेट टुगेदर होते. त्यावेळी वहिनी दशप्रीत कौर हिच्याकडे दागिने मागितले. तेव्हा तिने दागिने देण्यास टाळाटाळ केली. त्यावर पुण्यात कधी येणार व माझे दागिने परत कधी करणार, असे विचारले. त्यावर दशप्रीत कौर म्हणाली की, पुण्यात परत जाण्याचा अद्याप विचार केला नाही़ असे म्हणून तिने दागिने देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर १६ नोव्हेबर २०२३ रोजी त्यांचा भाऊ नवदीपसिंह नरुला याने सांगितले की, मी तुझे दागिने देण्याबाबत दशप्रीतला सांगितले, परंतु, दशप्रीतने दागिने देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादी यांना कौटुंबिक लग्नाला जायचे असल्याने त्यांनी वहिनी दशप्रीत कौर हिला फोन करुन दागिने परत मागितले असता तिने मी तुझे दागिने परत करणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी बराच काळ वाट पाहिली. त्यांनी कायदेशीर कारवाई करावी, यासाठी शिवाजीनगर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करीत आहेत.

You may have missed