Pune Crime News | पुण्यातील बाणेरमधून आंतरराज्यीय महाठग गजाआड; फायनान्स कंपनीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या विनोद शांताराम गडाख पाटील याला अटक
पुणे / चंद्रपूर : Pune Crime News | फायनान्स कंपनीच्या नावाने कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय भामट्याला चंद्रपूर सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. विनोद शांताराम गडाख पाटील Vinod Shantaram Gadakh Patil (वय ४४, रा. बाणेर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने देशभरात विविध बनावट नावांचा वापर करून अनेकांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे.
चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरातील एका हार्वेस्टर मशीन विक्रेत्याशी संपर्क साधत आरोपीने स्वतःची ओळख ‘हेमंत जोशी’ अशी करून दिली होती. तसेच तो ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीत कर्मचारी असल्याचे भासवत ग्राहकाला १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे बनावट पत्र दिले. त्यानंतर डाऊन पेमेंटच्या नावाखाली तब्बल ४ लाख ४६ हजार २५० रुपये ऑनलाइन स्वरूपात उकळले.
१६ मे २०२६ रोजी संबंधित रक्कम भरल्यानंतर आरोपीने आपला मोबाईल बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने सायबर हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील बाणेर येथील फ्लॅटवर छापा टाकून आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
देशभरात १० बनावट नावांचा वापर
तपासादरम्यान आरोपीने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये ‘हेमंत जोशी’, ‘रणवीर सिंग’, ‘मयंक वानखेडे’ यांसह १० हून अधिक बनावट नावांचा वापर करून फसवणुकीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. आरोपीच्या इतर गुन्ह्यांचाही पोलिसांकडून शोध घेतला जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
