Pune Crime News | व्यावसायिकाला मारहाण करुन गाडी अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे दोघे गुंड दोन महिन्यानंतरही फरारच, पोलिसांच्या हाती लागेनात
पिंपरी/ पुणे : Pune Crime News | लग्नाची पार्टी देण्यास दबाव टाकून गाडीतून घेऊन जात असताना मारहाण केल्याने व्यावसायिक गाडीतून उतरुन पळू लागला. तेव्हा त्याच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे ठार मारण्याचा दोघांनी प्रयत्न केला. निगडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला परंतु, या घटनेला आता २ महिने होत आल्यानंतरही आरोपी मोकाट असल्याचे सांगितले जात आहे.
अमर बंडु उघडे Amar Bandu Ughade (वय २९, रा. गुरुदत्त सोसायटी, ओटा स्कीम, निगडी) आणि अमर जितेंद्र कसबे Amar Jitendra Kasbe (वय २९, रा. गुरुदत्त सोसायटी, ओटा स्कीम, निगडी) अशी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. याबाबत सावन हिरासिंग राठोड (वय २९, रा. मोरया सोसयटी, पुर्णानगर, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावन राठोड यांचे निगडी गावठाण येथे व्हिजन ऑप्टिक्स नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानावर अमर उघडे हा कधी कधी येत होता. अमर कसबे हा त्यांच्या ओळखीचा आहे. ५ जून २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुुमारास फिर्यादी दुकानात असताना त्यांचा मित्र अमर उघडे हा भेटला. त्याच्याबरोबर अमर कसबे हाही ब्रिझा गाडीमध्ये बसला होता. अमर उघडे याने सावन राठोड यांचे लग्न ठरल्याबाबत बाहेरुन समजले. आम्हाला का सांगितले नाही, असे विचारले. तेव्हा सावन राठोड यांनी लग्न प्रत्रिका छापल्यावर सांगणार होतो, असे सांगितले.
त्यावर त्याने लग्न ठरल्या निमित्त पार्टी मागितली. तेव्हा त्यांनी तुम्ही पार्टी करा, मी स्कॅनरवर पैसे पाठवतो, असे बोलले. त्यावर अमर उघडे याने बरोबर घेण्याचा आग्रह करुन त्यांना गाडीत बसायला लावले. त्यानंतर ते हॉटेल शोधत यमुनानगर कडे जात होते. सावन यांना पार्टी देण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्यावर याचा राग येऊन अमर उघडे याने गाडीतच हाताने मारहाण केली. त्यामुळे दुर्गा नगर सिग्नलजवळ गाडी थांबली असताना सावन गाडीचा दरवाजा उघडून उतरू लागले. तेव्हा अमर कसबे याने त्यांचा शर्ट पकडला. परंतु, त्याला हिसका देऊन ते गाडीतून उतरुन यमुनानगर चौकीच्या दिशेने पळु लागले. तेव्हा त्यांच्या मागे अमर उघडे हा पळत येत असताना अडखळून खाली पडला. त्यानंतर अमर कसबे हा त्याच्या ताब्यातील गाडी घेऊन मागे घेऊन आला.
स्विमिंग टँकजवळ रोडवर त्याने गाडी अंगावर घालून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जोरात ठोकर दिली. त्यामुळे ते रोडवर खाली पडले. तिथून उठून ते बजाज कंपनी गेटकडे धावत गेले. तेव्हा अमर कसबे हा गाडीतून उतरुन हातात लाकडी दांडा घेऊन रोडवर मोठमोठ्याने ओरडू लागला. माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत. माझ्या नादी लागशील तर जिवाने मरशील, असे म्हटल्याने जमलेले लोक तेथून पळून गेले. अमर उघडे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांचा भाऊ पवन हिरासिंग राठोड (वय ३४) यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी अमर कसबे व अमर उघडे यांना माझ्या भावास का मारले, याचा जाब विचारला. अमर उघडे याने त्यास हाताबुक्क्यांनी व गाडीचे चावीने हातावर मारहाण केली होती. निगडी पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेला आता २ महिने झाले असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याचे फिर्यादी सावन राठोड यांनी सांगितले.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक जयदीप दळवी यांनी सांगितले की, या आरोपींवर २ गुन्हे दाखल असून त्यांचा शोध सुरू आहे.
