Ravindra Dhangekar | पुणे : ‘एकनाथ शिंदेंमुळे भाजपा सत्तेत, कुरघोडीचं राजकारण थांबवा, अन्यथा…’; रवींद्र धंगेकरांचा भाजपाला इशारा
पुणे : Ravindra Dhangekar | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत यश मिळाले आणि सरकार सत्तेत आले, असा दावा शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
भाजपाने शिवसेनेच्या योगदानाची जाणीव ठेवून आभार मानावेत आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना नेत्यांविरोधात होणारी आक्षेपार्ह वक्तव्ये थांबवावीत, अशी मागणी त्यांनी केली.
प्रत्येक मतदारसंघात हजारो महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आणि त्या एकनाथ शिंदे व महायुतीच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यामुळे महायुतीच्या आमदारांना विजय मिळाल्याचे धंगेकर यांनी म्हटले.
भाजपातील काही नेते विरोधकांना रोखण्याऐवजी मित्रपक्षालाच कमकुवत करण्याचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. उदय सामंत आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांविरोधात करण्यात आलेल्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत संबंधित नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, असे ते म्हणाले.
अशा प्रकारची वक्तव्ये सुरूच राहिली आणि भाजपाच्या नेतृत्वाने त्याची दखल घेतली नाही, तर आम्हालाही सार्वजनिकपणे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा धंगेकर यांनी दिला.
काही नेते केवळ प्रसिद्धीसाठी वादग्रस्त आणि वैयक्तिक वक्तव्ये करत असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. अन्यथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधित कथित बाबी पुराव्यांसह सोशल मीडियाद्वारे जनतेसमोर मांडल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
