Pune Crime News | जमीन व्यावसायिकावर गोळीबार करणारे दरोडेखोर जेरबंद ! मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये कारवाई; आतंरराज्य दरोडेखोरांची टोळी

Pune Crime News | Robbers who shot at a land businessman caught! Action in Ujjain, Madhya Pradesh; a gang of inter-state robbers

पुणे : Pune Crime News |  जमीन खरेदी विक्री करणार्‍या व्यावसायिकाच्या कारवर गोळीबार करुन त्यांच्याकडील ११ लाख रुपयांचे २२ तोळ्यांचे दागिने लुटणार्‍या दरोडेखोरांना मध्यप्रदेशातील उज्जैन परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून देशी बनावटीची तीन पिस्तुले, सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरोडेखोरांविरुद्ध उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, नेपाळमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

अविनाश किशनचंद त्रिपाठी (वय ४३, सध्या रा. क्रिस्टन सोसायटी, बकोरी, ता. हवेली, मूळ रा. उत्तर प्रदेश ), सुरेंद्रपाल रामचंद्र पाल (वय ३२, रा. भिलवल, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश), मोहम्मद शोएब वसीम खान (वय ३७, रा. आझादनगर, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील शिरसवाडी परिसरातून व्यावसायिक मर्सिडिस कारमधून निघाले होते. त्या वेळी आरोपींनी कार अडवून चालकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करुन २२ तोळ्यांचे दागिने लुटले. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाकडून तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपासात आरोपी इंदौर  परिसरात असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, संदीप येळे, अमोल ढोणे, किरण पलांडे तसेच सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व त्यांचे सहकारी इंदौरला रवाना झाले. इंदौर येथे गेल्यावर आरोपी हे उज्जैन येथे गेल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलीस पथक तातडीने उज्जैनच्या दिशेने रवाना झाले. तराना तालुक्यातील कायथा गावातील एका घरात हे दरोडेखोर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास पोलीस पथकाने या घरावर छापा घालून त्यांना प्रतिकाराची कोणतीही संधी न देता तिघांना ताब्यात घेतले. तिघांना आरोपींची उज्जैनमधील न्यायालयाकडून प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवण्यात आली आहे. तिघांना घेऊन पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहेत. एक पथक अजूनही उज्जैन येथे थांबुन तपास करीत आहेत.

आरोपी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अहिल्यानगर रस्त्यावरील बकोरी परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. गोळीबार करुन आरोपी दुचाकीवरुन पसार झाले होते. एका आरोपीच्या दुचाकीवर दंड होता. सीसीटीव्ही चित्रीकरणात पोलिसांनी दुचाकीचे क्रमांक तपासले. तेव्हा एका दुचाकीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. दंडात्मक कारवाईचे ई-चलन तपासण्यात आल्यानंतर आरोपीचे नाव निष्पन्न झाले. लूटमार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार त्रिपाठी आहे. भारत आणि नेपाळमध्ये त्याने साथीदारांच्या मदतीने दरोडे टाकले होते. नेपाळ सरकारने त्याला पकडण्यासाठी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. उत्तर प्रदेश पोलिसांशी २०१८ मध्ये विशेष पोलीस पथकाबरोबर (एसटीएफ) चकमकीनंतर त्रिपाठी याला अटक करण्यात आली होती. त्रिपाठी याच्याविरुद्ध ७ खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार असे गंभीर स्वरुपाचे २०  गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार सुरेंद्रपाल याच्यावर उत्तर प्रदेशात चोरी, लुटमारीचे १२ गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद खान याच्यावर उत्तरप्रदेशात ५ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, संतोष सोनवणे, राम राजमाने, वाहिद पठाण, कांचन जाधव, सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण, अफरोज पठाण, श्रीकांत चव्हाण, मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे पोलीस हवालदार परेश सावंत, पोलीस अंमलदार अमोल ढोणे, किरण पलांडे, संदीप येळे, विनायक येवले, विनायक साळवे, सारंग दळे, निलेश साळखे, गिरीष नाणेकर, भरत उकीर्ड, सुहास तांबेकर, प्रफुल्ल मोरे, विक्रांत सासवडकर, पांडुरंग नाणेकर, राहुल इंगळे यांनी केली़  त्यांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने तांत्रिक सहाय्य केले.

You may have missed