Pune Crime News | भाड्याने घेतलेली इमारत परत करण्यासाठी २ कोटी द्या, नाही तर मालमत्ता विसरुन जा, माझे अनेक गुन्हेगार टोळीशी संबंध असल्याची जागा मालकाला धमकी

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | औंध येथील कर्मशियल इमारत लिव्ह अ‍ॅन्ड लायसन्स करारनाम्याने घेतली. त्यानंतर आता जागा पाहिजे असेल तर २ कोटी रुपये द्या, नाही तर जागा विसरुन जा. माझे अनेक गुन्हेगार टोळीशी संबंध आहेत. मालमत्ता पेटवुन देईन, अशी जागा मालकाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत महेंद्र संपतराव गोडगे (वय ४९, रा. सनराईज अपार्टमेंट, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सत्यप्रकाश शंभु पोद्दार Satyaprakash Shambhu Poddar (वय ४७) आणि प्रदीप शंभु पोद्दार Pradeep Shambhu Poddar (वय ४२, दोघे रा. सुवर्णयुग सोसायटी, नागरस रोड, औंध) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र गोडगे यांची औंध रिट्रीट येथे हॅपीलेस्ट अपार्टमेंट आहे. ही व्यापारी इमारत सत्यप्रकाश पोद्दार यांना लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स करारनाम्याने ३० जून २०२१ पर्यंत वापरण्यास दिली होती. तेथे त्यांनी गेस्ट हाऊस सुरु केले होते. ३० जून २०२१ ची मुदत संपल्यानंतर सत्यप्रकाश पोद्दार याने मिळकत खाली केली नाही व त्यानंतर त्याचे भाडे देत नाही. सत्यप्रकाश याचा भाऊ प्रदीप पोद्दार हा १३ जून २०२६ रोजी फिर्यादीच्या घरातील कार्यालयात आला. ही मिळकत परत देणार नाही़ ही मिळकत परत हवी असेल तर सेटलमेंट करा, असे सांगितले. 

त्यानंतर त्याने सत्यप्रकार पोद्दार याला फोन करुन फिर्यादी यांना मिळकत परत हवी असेल तर २ कोटी रुपये द्या, नाही तर मालमत्ता विसरुन जा. जागा सोडणार नाही, काय करायचे ते करा. त्याचे अनेक गुन्हेगार टोळीशी संबंध आहेत. गरज पडली तर मालमत्ता पेटवुन देईन, असे बोलून फोन कट केला. त्यानंतर प्रदीप पोद्दार याने सत्यप्रकाश याला सांगितल्याप्रमाणे केले नाही तर फिर्यादी यांच्या कुटुंबियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली आहे. या धमकीला घाबरुन त्यांनी इतके दिवस तक्रार दिली नव्हती. शेवटी हिमंत करुन त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करीत आहेत.

You may have missed