Pune CID News | रांजणगावात 9,536 किलो गांजाची पर्यावरणपूरक विल्हेवाट; 12.47 कोटींचा मुद्देमाल नष्ट

Pune CID News | Eco-friendly disposal of 9,536 kg of ganja in Ranjangaon; goods worth 12.47 crore destroyed

पुणे : Pune CID News | राज्यातील अमली पदार्थविरोधी कारवाईला अधिक वेग देत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या ९ हजार ५३६ किलो गांजाची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली. रांजणगाव येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेडच्या प्रकल्पात गुरुवारी ही प्रक्रिया पार पडली.

नष्ट करण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत १२ कोटी ४७ लाख ३० हजार ४५० रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘नशामुक्त भारत-२०२९’ अभियानांतर्गत आणि राज्य सरकारच्या अमली पदार्थांविरोधातील ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार ही कारवाई करण्यात आली.

दोन समित्यांमार्फत विल्हेवाट

उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समितीमार्फत ३ हजार १५१ किलो गांजा नष्ट करण्यात आला. या मुद्देमालाची किंमत ५ कोटी २० लाख १० हजार रुपये होती.

घटकस्तरीय ड्रग डिस्पोजल समितीमार्फत ६ हजार ३८५ किलो गांजाची विल्हेवाट लावण्यात आली. या गांजाची किंमत ७ कोटी २७ लाख २० हजार ४५० रुपये होती.

अशा प्रकारे दोन्ही समित्यांच्या माध्यमातून एकूण ९ हजार ५३६ किलो गांजा नष्ट करण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पुढाकाराने करण्यात आली. या वेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतीप्रिया सिंग, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील आणि धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपस्थित होते.

उच्चस्तरीय आणि घटकस्तरीय ड्रग डिस्पोजल समित्यांचे सदस्य तसेच एएनटीएफचे अधिकारी व कर्मचारीही या प्रक्रियेदरम्यान उपस्थित होते.

अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला वेग

राज्यात अमली पदार्थांचे उत्पादन, वाहतूक, विक्री आणि सेवन रोखण्यासाठी एएनटीएफकडून सातत्याने विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.

अमली पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You may have missed