Pune News | ऐश्वर्य कट्ट्यावर ‘क्लास वन’ मैफिल; दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिलखुलास संवादाने जिंकली मने
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांचा मुक्त संवाद;
स्मार्ट मीटर, भेसळ, प्रशासन आणि जनजागृतीवर थेट भूमिका
पुणे : Pune News | शासकीय अधिकारी म्हणजे केवळ फायली, नियम आणि औपचारिकता, अशी सर्वसामान्यांची धारणा. मात्र, ऐश्वर्य कट्ट्यावर बुधवारी रंगलेल्या मैफलीने हा समज अक्षरशः खोटा ठरवला. अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) चे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय प्रवासातील अनुभव, आव्हाने आणि जनहिताच्या प्रश्नांवर इतक्या मोकळेपणाने संवाद साधला की, उपस्थितांनी तब्बल तासभर ‘क्लास वन’ गप्पांचा मनमुराद आनंद घेतला.
सध्या अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यभर चर्चेचा विषय ठरत असताना, विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कामकाजाबाबत उपस्थित सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
सहआयुक्त भोगावडे यांनी प्रत्येक प्रश्नाला स्पष्ट आणि परखड उत्तरे देत, “मुंढे साहेब आल्यापासून विभागात नवा उत्साह निर्माण झाला असून कामाची गती आणि पारदर्शकता वाढली आहे,” असे सांगितले. अन्नातील भेसळ रोखण्या साठी केवळ कारवाई नव्हे, तर व्यापक जनजागृती हेच सर्वात प्रभावी शस्त्र असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनीही सध्या चर्चेत असलेल्या स्मार्ट मीटर विषयावरील गैरसमज दूर करताना, “स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढते, हा समज वस्तुस्थितीला धरून नाही. उलट ग्राहकांना अचूक वीज वापराची माहिती, पारदर्शक बिलिंग आणि भविष्यात अनेक तांत्रिक सुविधा मिळणार आहेत,” असे स्पष्ट केले. उपस्थितांच्या शंकांचे त्यांनी सविस्तर निरसन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दोन्ही मान्यवरांचे शंखनाद, औक्षण आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांना मानाचा फेटा, मोत्याची माळ, शाल, सन्मानपत्र आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी अप्पा रेणुसे मित्र परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐश्वर्य कट्टा हा केवळ गप्पांचा कट्टा नसून, समाज, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचा सेतू ठरत असल्या ची भावना व्यक्त करत, आजच्या कट्ट्यावरील माहिती पूर्ण, मनमोकळ्या आणि प्रेरणादायी संवादामुळे ही मैफल आमच्या कायम स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
