Pune Crime News | पुणे: जनता वसाहतीत सराईत गुन्हेगारासह तीन अल्पवयीन ताब्यात; 12 धारदार शस्त्रे जप्त
पुणे : Pune Crime News | पर्वती परिसरातील जनता वसाहतीत पोलिसांनी एका १८ वर्षीय कथित सराईत गुन्हेगारासह त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून १२ धारदार कोयते आणि लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालून फरार आरोपींचा शोध घेतला जात होता. यावेळी पोलिस अंमलदार उज्ज्वल मोकाशी आणि महेश मंडलिक यांना जनता वसाहतीतील राम मंदिरामागील गल्ली क्रमांक ७७ येथे गौरव राजू कांबळे (Gaurav Raju Kamble) हा त्याच्या तीन साथीदारांसह धारदार शस्त्रे घेऊन थांबल्याची माहिती मिळाली.
ही माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस पथकाने जनता वसाहतीत सापळा रचून गौरव कांबळे आणि त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १२ धारदार कोयते आणि लोखंडी शस्त्रे जप्त केली. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गौरव कांबळे आणि तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक उज्वल मोकाशी, संदीप शिर्के, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, नागनाथ राख, शंकर नेवसे, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार, योगेश मांढरे आणि विनायक वगारे यांनी सहभाग घेतला.
