Pune Crime News | जमीन खरेदी विक्री करणार्‍या व्यावसायिकावर गोळीबार करुन ११ लाख रुपयांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या तिघा चोरट्यांनी नेल्या चोरुन; गालात शिरली होती गोळी

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | कार्यालय बंद करुन मर्चिडिस कारने घरी जाणार्‍या जमीन खरेदी विक्री करणार्‍या व्यावसायिकावर मोटारसायकलवरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी गोळीबार केला. त्यातील एक गोळी गालात अडकून ते गंभीर जखमी झाले. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ११ लाख रुपयांच्या २२ तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन साखळ्या  जबरदस्तीने चोरुन नेल्या.

संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवाडी) असे जखमी झालेल्या या व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना गावडेवाडी शिरसवाडी परिसरातील पंडित गावडे यांच्या बंगल्यासमोर बुधवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याबाबत दत्तात्रय महादेव गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवाडी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गावडे हे हवेली तालुक्यात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. वाडे बोल्हाई चौकात त्यांचे कार्यालय आहे. बुधवारी रात्री ते कार्यालय बंद करुन मर्चिडीस कारने घरी जात होते. शिरसवाडी गावडेवाडी रोड पंडित गावडे यांच्या घराजवळ दोन मोटारसायकलवरुन तिघे जण आले. त्यांनी गाडी थांबविण्यास भाग पाडून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी त्यांच्या गालात शिरली. ते जखमी झाले असताना त्यांच्या गळ्यातील ११ लाख रुपयांच्या २२ तोळे वजनाच्या २ सोन्याच्या साखळ्या जबरदस्तीने हिसकावुन ते पळून गेले. गोळीबाराचा आवाज ऐकताच लोक धावत आले. त्यांनी संतोष गावडे यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्यांच्या गालात अडकलेली गोळी काढली असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. हल्लेखोरांचा अद्याप तपास लागला नाही. सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत.

You may have missed