Chandrakant Patil | पुण्याला ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ करण्यासाठी एनबीटीचे केंद्र ठरणार महत्त्वाचे

Chandrakant Patil | Pune to become the center for NBT to make it the ‘World Book Capital’

पुणे पुस्तक महोत्सवामुळे वाचन संस्कृतीला मिळाले बळ; वर्षभरात आवश्यक तयारी पूर्ण करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे : Chandrakant Patil | अवघ्या २०० पुस्तक दालनांपासून सुरू झालेला पुणे पुस्तक महोत्सव आज हजार दालनांपर्यंत पोहोचला आहे. या महोत्सवामुळे पुण्यासह राज्यातील वाचन संस्कृतीला मोठे बळ मिळाले आहे. आगामी काळात पुण्याला ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ बनविण्यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करून सर्वांनी एकत्रितपणे काम करावे लागेल. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) पश्चिम विभागीय केंद्राची त्यामध्ये महत्त्वाची भूमिका असेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) आणि पुणे पुस्तक महोत्सवाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एनबीटीच्या पश्चिम विभागीय कार्यालयाच्या कामाचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी केंद्राला ‘ राजमाता जिजाऊ सेंटर फॉर रीडिंग अँड एक्सलन्स ‘ नाव देण्याची घोषणा मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. महापौर मंजुषा नागपुरे, एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक कर्नल युवराज मलिक (निवृत्त), ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, एनबीटीचे विश्वस्त व पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस आदी उपस्थित होते. बाणेरमधील गणराज चौकाजवळ हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठी सहकार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पाटील म्हणाले, एनबीटीच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे सुशोभीकरण लवकर पूर्ण करून ते पुणेकरांसाठी खुले करण्याचा प्रयत्न आहे. लेखक, कवी, साहित्यिक, प्रकाशक, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी येथे विविध उपक्रम, कार्यक्रम तसेच नावीन्यपूर्ण विषयांवरील कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून अधिकाधिक शालेय विद्यार्थ्यांना वाचन चळवळीशी जोडण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. पुण्यातील दररोज एक शाळा या केंद्राला भेट देईल, या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. मराठे म्हणाले, पुस्तक वाचन हा जीवनाचा पाया आहे. एका आयुष्यात अनेक जीवनांचे अनुभव पुस्तकांतून घेता येतात. त्यामुळे वाचनाला पर्याय नाही. पश्चिम विभागीय केंद्र वाचन चळवळीला नवे बळ देणारे ठरेल. एनबीटीने शालेय विद्यार्थ्यांपासून ते ३० वर्षांपर्यंतच्या युवकांवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, या केंद्रातून भविष्यातील लेखक, साहित्यिक, विचारवंत, शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ घडतील, यात शंका नाही.

पांडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवात २०० दालनांपासून झाली होती. आज ही संख्या हजारांवर पोहोचली असून, यंदाच्या महोत्सवात सुमारे १२०० दालने असतील. पुणे पुस्तक महोत्सवाला जागतिक स्तरावरील कॅलेंडर इव्हेंट बनविण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता एनबीटीचे पश्चिम विभागीय कार्यालय पुण्यात सुरू होत असून, पुढील लक्ष्य पुण्याला ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ बनविण्याचे आहे. त्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल.

मलिक म्हणाले, वाचन संस्कृती अधिक व्यापक करण्यासाठी एनबीटी सातत्याने प्रयत्नशील आहे. या केंद्राचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि ते देशातील सर्वोत्तम विभागीय केंद्रांपैकी एक असेल. लेखक, कवी, प्रकाशक, शालेय विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि साहित्यिकांसाठी येथे बहुतेक सुविधा विनामूल्य उपलब्ध असतील. महाराष्ट्रातील वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुणे, मुंबई आणि नागपूर येथे पुस्तक प्रदर्शन आयोजित करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. प्रसेनजित फडणवीस यांनी आभार मानले.

एनबीटीच्या पश्चिम विभागीय केंद्राची वैशिष्ट्ये

* दरवर्षी अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट
* पुस्तक विक्री केंद्र, वेअरहाऊस आणि मोठा वाचन कक्ष
* शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम, कार्यशाळा व बौद्धिक खेळांची सुविधा
* २५० आसनक्षमतेचे सभागृह; लेखक-प्रकाशकांसाठी विनामूल्य उपलब्ध
* दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, परिषद कक्ष आणि कार्यालयीन व्यवस्था
* बुक पब्लिशिंग अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी; विद्यापीठ संलग्नीकरणाचा प्रस्ताव
* शनिवारी-रविवारी पुस्तक प्रकाशनासाठी सुविधा

•  पुस्तके आणि साहित्याचा प्रचार – प्रसार करण्यासाठी दोन ते तीन बसेस. विविध जिल्ह्यात पुस्तक प्रदर्शनाचे नियोजन

* पुढील आठवड्यापासून विविध सुविधांच्या आरक्षण प्रक्रियेला सुरुवात; माहिती एनबीटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार

You may have missed