Pune Crime News | मातीचे पूर्ण पैसे दिले असताना जास्तीचे 5 हजार रुपये देण्यास नकार दिल्याने दोघा भावांनी नर्सरीचालकावर वार करुन बेशुद्ध पडेपर्यंत केली मारहाण, मध्ये पडलेल्या भावावरही केले वार
पुणे : Pune Crime News | नर्सरीसाठी लागणारी लाल माती पुरविल्याचे १८ हजार रुपये दिले असताना जास्तीचे ५ हजार रुपये देण्यास नकार दिला. या कारणावरुन दोघा भावाने नर्सरीचालकाच्या पाठीत लोखंडी हत्याराने वार करुन बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. त्याला सोडविण्यासाठी आलेल्या भावालाही बेदम मारहाण केल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत मनेष भाऊसाहेब जवळकर (वय ४३, रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी कुणाल दीपक जवळकर Kunal Deepak Jawalkar व केतन दीपक जवळकर Ketan Deepak Jawalkar (दोघे रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार म्हातोबाची आळंदी येथे ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनेष जवळकर यांच्यावर वरद लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. तर, त्यांचा भाऊ धनंजय जवळकर यांच्यावर मांजरीतील लाईफ केअर हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहे.
मनेष जवळकर यांची जय गणेश नर्सरी ही शिंदे वस्ती येथे आहे. नर्सरीसाठी लागणारी लाल माती घेत असतात. कुणाल जवळकर हा त्यांना दरवर्षी एक हायवा लाल माती देतो. १८ हजार रुपयांना हायवा ट्रक असा दर ठरला होता. त्याप्रमाणे मे महिन्यात त्याने नर्सरीमध्ये एक हायवा माती टाकली. त्याचे १० हजार रुपये रोख दिले. ८ हजार रुपये दोन महिन्यांनी देण्याचे ठरले होते. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कुणाल व केतन जवळकर हे नर्सरीत आले. त्यांनी पैसे मागितल्याने ८ हजार रुपये त्यांना ऑनलाईन दिले. त्यावर ते ५ हजार रुपये जास्तीचे मागू लागले. त्यांनी जास्तीचे पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्यांना हाताने मारहाण केली. त्याची त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नंतर पुन्हा नर्सरीमध्ये काम करण्यास गेले.
ते पत्नीसह दुचाकीवरुन सायंकाळी ६ वाजता घरी जात होते. त्यावेळी केतन व कुणाल यांनी त्यांच्या घरासमोर रस्त्यात अडवले. धक्काबुक्की करुन त्या दोघांना गाडीवरुन पाडले. केतन याने त्याच्याकडील लोखंडी हत्याराने खांद्यावर वार केला. त्यामुळे त्यांना काही समजले नाही. ते जागेवरच बेशुद्ध झाले. यावेळी कुणाल याने त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली. त्यांना सोडविण्यासाठी भाऊ धनंजय जवळकर हे आले असता कुणाल याने त्याला पकडून ठेवले. केतन याने त्याच्यावरही हत्याराने वार करुन जखमी केले. दोघांवरही रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
