Pune Crime News | विनापरवाना टेकडी फोड करणार्या हिलव्हिव परसेप्ट रिअॅलिटी, स्टार कन्स्ट्रक्शन, प्राईम अक्षरच्या संजय मेहता, अनिल ललवानी यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | शहराच्या आसपास असलेल्या टेकड्यांवर बेकायदेशीरपणे तोडफोड करुन तेथील दगड, डबर घेऊन ती जागा सपाट करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. एकदा या जागेचे सपाटीकरण झाले की तेथे उंचच उंच इमारती बांधल्या जात आहे. अशा बेकायदेशीर टेकडीफोडीकडे प्रशासनाने आजवर दुर्लक्ष केल्याने शहर व परिसरातील टेकड्यांवर सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे. बिबवेवाडी येथील मुंजेरी टेकडीवर अशीच बेकायदेशीर टेकडीफोड करण्यांची दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे.
याबाबत पुणे शहर तलाठी स्मिता सचिन आवनकर (वय ४२, रा. सुंदरबाग, धनकवडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हिलव्हिव परसेप्ट रिअॅलिटी Hillview Percept Realty व स्टर कंस्ट्रक्शन आणि प्राईम अक्षर एल एल पी (Prime Akshar LLP) तर्फे संजय मेहता (Sanjay Mehata Prime Akshar LLP) आणि अनिल ललवानी (Anil Lalwani Prime Akshar LLP ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हे नंबर ५७९/१अ, ५७९/१ब, ५८० पी यांचा सिटी सर्व्हे नंबर ३५६/१, ३५६/१, ३२१४ हे क्षेत्र १ हेक्टर ५८ आर मध्ये तीव्र उताराची टेकडी आहे. याबाबत कोणतीही परवानगी न घेता आरोपींनी विनापरवाना बेकायदेशीररित्या टेकडी फोडून अनियमितता करुन पर्यावरणास हानी पोहचवली आहे. ग्राम महसूल अधिकारी स्मिता आवनकर यांनी त्यांना नोटीस बजावून काम थांबविण्यास सांगितले होते. तरीही त्यांनी टेकडीफोड चालूच ठेवल्याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पर्यावरण संरक्षण कायदा १९६६ क १५, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ क व खाण आणि खनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार चिनके तपास करीत आहेत.
