Pune PMC News | राजाराम पूल रुंदीकरणासाठी खासगी सल्लागार; 1.08 टक्के दराने नियुक्तीचा मार्ग मोकळा
सिंहगड रस्ता-कर्वेनगर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 30 मीटर रुंदीकरण; स्थायी समितीची मंजुरी
पुणे : Pune PMC News | सिंहगड रस्ता ते कर्वेनगर डी. पी. रस्त्याला जोडणाऱ्या राजाराम पुलाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून ‘सबडक्शन झोन कन्सल्टंट्स प्रा. लि.’ या कंपनीची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. प्री-टेंडर आणि पोस्ट-टेंडर प्रक्रियेबरोबरच प्रत्यक्ष कामावर देखरेख करण्याची जबाबदारी या सल्लागार कंपनीवर सोपविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प खर्चाच्या १.०८ टक्के शुल्क देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
मान्य विकास आराखड्यानुसार राजाराम पुलाची रुंदी ३० मीटर अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात हा पूल केवळ १८ मीटर रुंदीचा आहे. कर्वेनगरकडून येणारी वाहतूक तसेच सिंहगड रस्त्याकडून पुलावर येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने या पुलावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पुलाचे रुंदीकरण करण्याचे नियोजन महापालिकेच्या मुख्य अभियंता (प्रकल्प) विभागाने केले आहे.
या कामासाठी महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात ८ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या कामाला अद्याप वित्तीय मान्यता मिळालेली नाही. वित्तीय मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, उर्वरित आवश्यक निधी पुढील आर्थिक वर्षात उपलब्ध करून घेण्याचे नियोजन आहे.
तज्ज्ञ सल्लागार नियुक्तीसाठी निविदा
राजाराम पूल रुंदीकरणाच्या कामासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्यासाठी एकूण पाच निविदा प्राप्त झाल्या. तांत्रिक छाननीनंतर गुणवत्ता आणि खर्चावर आधारित निवड पद्धतीनुसार (क्यूसीबीएस) तीन निविदादार पात्र ठरले. त्यानंतर त्यांच्या आर्थिक निविदा उघडण्यात आल्या.
यामध्ये सबडक्शन झोन कन्सल्टंट्स प्रा. लि. यांनी प्रकल्प खर्चाच्या १.०८ टक्के दराने काम करण्याची तयारी दर्शविली. एमएपीएस ग्लोबल सिव्हिलटेक प्रा. लि. यांनी १.५५ टक्के, तर एनव्हायरोसेफ सल्लागार यांनी १.६२ टक्के दर सादर केला. सर्वांत कमी दर असल्याने सबडक्शन झोन कन्सल्टंट्सची नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
राजाराम पुलाचे रुंदीकरण झाल्यानंतर सिंहगड रस्ता, कर्वेनगर आणि डी. पी. रस्त्यादरम्यानची वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, पुलाच्या प्रत्यक्ष रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वी वित्तीय मंजुरीसह सल्लागार नियुक्ती आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
