Pune Crime News | भावाकडून पैसे घेण्यासाठी उत्तर प्रदेशच्या तरुणाने घडवुन आणले स्वत:चे अपहरण; पोलिसांना सापडला एकटाच लॉजवर

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशनवरुन आपले अपहरण झाले असून ते ५ लाख रुपये मागत असल्याचा रडत असलेल्या भावाचा व्हिडिओ पाहून उत्तर प्रदेशातील कुटुंब हादरुन गेले. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क केला. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही माहिती पुणे पोलिसांना दिली. पुणे रेल्वे स्टेशनवरुन अपहरण झाल्याचे समजल्याने गुन्हे शाखेसह परिमंडळ २ मधील पोलीस उपायुक्तांपासून बंडगार्डन पोलीस सतर्क झाले. त्यांनी तांत्रिक विश्लेषणातून हा तरुण खडकी येथे असल्याचे समजले. तेथील लॉजवर शोध घेतल्यावर तो एकटाच तेथे रहात असल्याचे दिसून आले. चौकशीमध्ये त्याने भावाकडून पैसे मिळविण्यासाठी स्वत:च अपहरणाचे नाट्य रंगवले. रडत असल्याचा व्हिडिओ तयार करुन घरी पाठविल्याचे उघड झाले.

ओम प्रकाश गौरीशंकर (वय १९, रा. जाललपूर, ता. बेबेरु, जि. बांदा, उत्तर प्रदेश) असे या तरुणाचे नाव आहे. तो नुकताच पुण्यात आला होता. त्याला काही काम धंदा नसल्याने खर्चासाठी पैसे नव्हते. अनेकदा त्याने गावाकडील घरातून पैसे मागितले होते. परंतु, ते कमी पडत होते. त्यावर त्याने एक शक्कल लढविली.

त्याने उत्तर प्रदेशात राहणार्‍या आपल्या भावाला आपल्याला किडनॅप केले असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास बसावा, यासाठी ढसाढसा रडत असलेला व्हिडिओ भावाला पाठविला. तसेच सुखरुप सुटका करायची असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. या प्रकाराने गौरीशंकरचे कुटुंबिय घाबरुन गेले. त्यांनी शाहजहांपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. उत्तर प्रदेश पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचे पुणे रेल्वे स्टेशनवरुन अपहरण झाले असल्याचे सांगितले.

अपहरण झालेल्या व्यक्तीचा मोबाईल नंबर पोलिसांना पाठविला. बंडगार्डन पोलिसांनी रविवारी मध्यरात्री शोधाशोध सुरु केली. या तरुणांचा मोबाईलचे तांत्रिक विश्लेशन केल्यावर तो खडकी येथे असल्याचे दिसून आले. सर्व पोलीस पथक खडकीत शोध घेऊ लागले. खडकी भागातील क्राऊन प्लाझा लॉज येथे त्याचे लोकेशन दिसून येत होते. पहाटेच्या सुमारास पोलीस लॉजमध्ये पोहोचले. तेव्हा गौरीशंकर हा एकटाच लॉजमधील खोलीमध्ये असल्याचे दिसून आले. लॉजचालकांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याचे अपहरण झाल्याचे आश्चर्य वाटले. त्यांनी याच्याबरोबर कोणी नव्हते. तो एकटाच असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी गौरीशंकर याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आपणच आपल्या भावाला आपले अपहरण झाल्याचा व्हिडिओ पाठविला असल्याची कबुली दिली.

याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले की, पुणे रेल्वे स्टेशनवरुन तरुणाचे अपहरण झाल्याचे समजल्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यासह सर्व पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. प्रत्यक्षात त्याचे कोणी अपहरण केले नव्हते तर, त्यानेच हा बनाव रचला होता. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या नातेवाईकांना बोलविण्यात आले आहे.