Pune Crime News | नवले पुलाजवळ प्रवाशाचा मोबाइल हिसकावणारा चोरटा अटकेत; ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | नवले पुलाजवळ बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून चोरीचा मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अभय गणपत येवले Abhay Ganpat Yeole (वय २६, रा. त्रिमूर्ती कॉलनी, काळेपडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका प्रवाशाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ८ ऑगस्ट रोजी आपल्या मूळगावी वाई येथे जाण्यासाठी निघाले होते. मध्यरात्री सुमारे अडीचच्या सुमारास ते मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पुलाजवळ असलेल्या थांब्यावर उभे होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेनंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. दरम्यान, संशयित आरोपी शिवतेजनगर परिसरात असल्याची माहिती पोलिस कर्मचारी सतीश मोरे आणि तानाजी सागर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून चोरीचा मोबाइल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक समीर गायकवाड, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तसेच पोलीस पथकाने केली.

You may have missed