Pune Accident News | केसनंद फाट्याजवळ टेम्पोच्या धडकेत २० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालक पसार

Pune Accident News

पुणे : Pune Accident News |  पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील केसनंद फाटा परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने २० वर्षीय बेकरी कामगाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला असून वाघोली पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

अरफात इसतियाक अन्सारी (वय २०, रा. संत तुकारामनगर, केसनंद फाटा, वाघोली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे मामा आसीफ नासीर अन्सारी (वय ४२) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरफात हा एका बेकरीमध्ये काम करत होता. रविवारी (१६ ऑगस्ट) पहाटे सव्वापाचच्या सुमारास तो वाघोलीतील केसनंद फाटा चौकातून दुचाकीवरून जात होता. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातात अरफात गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अपघातानंतर टेम्पो चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार करत आहेत.