Pune Crime News | पत्नीचा गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी करुन मुलगी असल्याने जबरदस्तीने गर्भपात करायला लावला

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | तुला मुलगा होत नाही, असे म्हणून पत्नीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन गळा दाबुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी करुन गर्भ मुलीचा आहे, हे समजल्यावर जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे (PSI Dhanaji Rangrao Tone) आणि सासु अनुसया रंगराव टोणे Anusaya Rangrao Tone (रा. पी एस व्हीला, शेवाळेवाडी, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत त्यांच्या पत्नीने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होत असल्याचे समजल्यावर धनाजी टोणे हे सुट्टीवर गेले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी टोणे हे मांजरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांचा १९ मे २०१९ रोजी जत येथे विवाह झाला आहे. लग्नानंतर धनाजी टोणे यांची मुंबई येथे नेमणुक होती. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांनी तू नोकरी कर, कमव, माझ्या जिवावर बसून खाऊ नको, तुला तुळशीसारखी सडवीन, तु घरातील काम व्यवस्थित करत नाहीत, असे म्हणून सातत्याने मारहाण मानसिक व शारीरीक छळ, अश्लिल शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात केली. २०२० मध्ये गर्भवती असताना ते पत्नीला दर तीन चार दिवसांनी मारहाण करत होते. सातव्या महिन्यात अंगावर बसून बेदम मारहाण केली.

२७ जानेवारी २०२२ मध्ये धनाजी टोणेवर मुंबई येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल केला. त्याचा राग घरी येऊन काढून पत्नीचे डोके जमिनीवर आपटून अमानुष मारहाण केली. घरातील साहित्य घेऊन काही एक न सांगता ते महिनाभर कोठे तरी फरार झाले होते.

मार्च २०२२ मध्ये त्यांची पुणे शहर पोलीस दलात बदली झाली. तेव्हापासून ते शेवाळवाडी येथील पी एस व्हिला सोसायटीत राहतात. मार्च २०२५ मध्ये त्या पुन्हा गर्भवती राहिल्या. तीन महिन्यांची गरोदर असताना १३ मे २०२५ रोजी धनाजी टोणे व त्यांच्या आईने त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणत्यातरी खेडेगावातील शेतातील घरात घेऊन जाऊन त्या ठिकाणी नेऊन गर्भलिंग तपासणी केली. १९ मे २०२५ रोजी गर्भात मुलगी असल्याचे समजल्यानंतर त्यांनी पत्नीवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकण्यास व मारहाण करण्यास सुरुवात केली.

सासु व पतीने त्यांना गर्भपात केला नाही तर दोन्ही मुलींना घेऊन तुला माहेरी जावे लागेल, माझ्यासोबत नांदायला थांबायचे नाही, अशी धमकी दिली. गर्भपाताला संमती देण्यास तिच्या वडिलांनी नकार दिल्यावर धनाजी टोणे यांनी ‘‘मी पोलीस उपनिरीक्षक आहे. मी अनेक लोकांना गाडले आहे. तुम्ही संमती कशी देत नाही, तेच पाहतो’’ अशी धमकी दिली. २३ मे २०२५ रोजी वाघोली येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात करुन घेतला. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. मानसिक संतुलन देखील बिघडले होते. त्यामुळे त्या माहेरी राहिल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलीस उपायुक्त यांनी त्यांच्या पतीला सक्त भाषेत समज दिली. त्यानंतर देखील घरी गेल्यावर त्यांना तू पोलीस आयुक्तांकडे तक्रार का केली म्हणून मारहाण केली. घरी भाजीपाला व घरगुती साहित्य आणून देत नसल्याने त्या ऑक्टोबर २०२५ मध्ये माहेरी गेल्या. त्यानंतर त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांनी त्याला दाद दिली नाही. आता त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ती मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक इरफान नदाफ तपास करीत आहेत.

You may have missed