Pune Crime News | पुणे : बेकायदेशीरपणे भिशी, दाम दुप्पट रक्कम करून देण्याचे अमीष; 20 कोटींहून अधिक रकमेचा अपहार, 3 महिलांसह 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल, तिघांना अटक

Pune Crime News | illegal chit fund and double money scheme fraud over rupees 20 crore allegedly misappropriated five booked including three women crime shirur

पुणे : Pune Crime News | शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे बेकायदेशीरपणे भिशी चालवून गुंतवणुकीची रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत सुमारे 39 जणांकडून 20 कोटींहून अधिक रक्कम जमा करून तिचा कथित अपहार केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.

सुलभा शरद नवले Sulabha Sharad Navale (वय 50), नितीन शरद नवले Nitin Sharad Navale (वय 32), सुहास शरद नवले Suhas Sharad Navale (वय 30), अश्विनी नितीन नवले Ashwini Nitin Navale आणि प्रतिक्षा सुहास नवले (Pratiksha Suhas Navale), सर्व रा. कारेगाव, ता. शिरूर, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी सुलभा, नितीन आणि सुहास नवले यांना अटक केली असून शिरूर न्यायालयाने त्यांना सोमवार, 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बारकू चंदर सोनवणे यांनी तक्रार दिली आहे. आरोपींनी 2020 मध्ये कारेश्वर भिशी मंडळ सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्याही सरकारी कार्यालयात, बँकेत किंवा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी नसतानाही भिशी मंडळ नोंदणीकृत असल्याचे भासवून लोकांना गुंतवणुकीवर दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.

ही भिशी डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होती. त्यानंतर गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम आणि परतावा मागितल्यानंतर संबंधितांनी टाळाटाळ केल्याचा तसेच काही जणांना दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पोलिसांनी संबंधितांचे जबाब नोंदवून गुंतवणुकीच्या नोंदींची पडताळणी केल्यानंतर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात सोनवणे यांच्यासह सुमारे 39 जणांनी एकूण 20 कोटी 34 लाख 65 हजार 500 रुपये गुंतवल्याचे समोर आले आहे.

ही रक्कम रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने विविध बँक खात्यांमध्ये जमा करून तिचा कथित अपहार करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

You may have missed