Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन 5 जणांची 67 लाखांची फसवणूक; महापालिकेच्या निवृत्त मुख्याध्यापकासह 5 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | पुणे महापालिकेत सेवक, हवालदार, पर्यवेक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन ५ जणांची ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी महापालिकेच्या शाळेतील निवृत्त मुख्याध्यापकासह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
संजय अनंता भालेराव Sanjay Ananta Bhalerao (रा. कर्वेनगर), शिवानंद बाळासाहेब पाटील Shivanand Balasaheb Patil (रा. कर्वेनगर), अमित दारवटकर, आनंद लोंढणवार, अमित सुहास देशपांडे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. संजय भालेराव हे महापालिकेच्या शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक आहेत. याबाबत खडकवासला येथील २३ वर्षाच्या तरुणाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना वडगाव येथील आनंद देवराम डफळ यांच्या घरी २०२४ ते जून २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खडकवासला परिसरातील नांदोशी येथील राहणारे आहेत. त्यांची दोन वर्षांपूर्वी संजय भालेराव यांच्याशी ओळख झाली. त्यांनी महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी व इतर चौघांना महापालिकेत सेवक, हवालदार व पर्यवेक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन त्यांच्याकडून एकूण ६७ लाख रुपये वेळोवेळी घेतले. त्यांना महापालिकेचे शिक्के व अधिकारी यांचे सहीचे वैद्यकीय तपासणीचे पत्र दिले. त्याआधारे त्यांची वैद्यकीय तपासणी करुन घेतली. त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांचे मनपाचे शिक्के व अधिकारी यांचे सहीचे बनावट आदेश दिले. ओळखपत्र दिले. त्यांनी महापालिकेत जाऊन चौकशी केल्यावर त्यांना हे आदेश बनावट असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी भालेराव व इतरांकडे पैसे परत मागितले. त्यांनी पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. गेले काही दिवस महापालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणुक झाल्याचे गुन्हे दाखल झाले असल्याचे समजल्यानंतर त्यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक भुपेश साळुंके तपास करीत आहेत.
