Pune Crime News | ‘ज्यादा मस्ती आयी है क्या, काटके हैद्राबाद के किसी गली मे फेंक देंगे’; 50 कोटींचे कर्ज मिळवुन देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची 48 लाखांची फसवणूक
पुणे : Pune Crime News | सिक्युरिटी एजन्सी चालविणार्या व्यावसायिकाला ५० कोटी रुपयांचे कर्ज अल्प व्याज दरात मिळवुन देण्याचे आमिष दाखवून त्यांना ४८ लाख ९३ हजार ५८० रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी पैसे परत मागितल्यावर हैद्राबादमधील गल्लीमध्ये कापून टाकून देण्याची या व्यावसायिकाला धमकी दिली गेली. नर्हे पोलिसांनी तिघांंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सिंहगड रोडवरील एका ४९ वर्षाच्या व्यावसायिकाने नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन मनोहर शिवलिंग जिंदम Manohar Shivling Jindam (रा. अयोध्यानगर, सावेडी, अहिल्यानगर) आणि अशोक कुमार लाजीशेट्टी Ashok Kumar Lajishetti (वय ५२, रा. ममता रेसिडेन्सी, कुतुबुलापूर, रंगारेड्डी, तेलंगणा), सौजन्या बोरा Saujanya Bora Hyderabad (वय ४३, रा. पुतळी बाऊली, एक्स रोड, कोटी हैद्राबाद, तेलंगणा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव येथील फिर्यादी यांच्या घरी १४ एप्रिल २०२४ ते आजपर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सिक्युरिटी एजन्सीचा व्यवसाय आहे. त्यांची एका मित्राच्या मार्फत मनोहर जिंदम यांच्याशी ओळख झाली. ते पुण्यात अनेकदा फिर्यादी यांच्या कार्यालयात येत असत. फिर्यादी यांना व्यवसायासाठी भांडवलाची गरज असल्याचे त्यांना समजले. त्यांनी हैद्राबाद येथून खूप कमी व्याजदरामध्ये पैसे वापरावयास मिळतात व मी तुम्हाला ५० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे पटवून दिले. १२ ते १४ वर्षांची ओळख असल्याने त्यांचा त्यावर विश्वास बसला. त्यांनी कर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे ई मेल केली. त्यांनी सुरुवातील १५ हजार रुपये मागितले. ते फिर्यादी यांनी दिले. त्यानंतर १५ जून २०२४ रोजी ते वडगाव कार्यालयात आले. तेव्हा कर्ज प्रक्रियेसाठी १० लाख रुपये मागितले. तेव्हा त्यांनी ते दिले.
त्यानंतर त्यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी हैद्राबाद येथे नेले. तेथे कर्जासाठी करारनामा बनवायचा असल्याचे सांगून २ लाख रुपये घेतले. ते अशोक कुमार लाजीशेट्टी व सौजन्या बोरा यांच्याकडे घेऊन गेले. हे दोघे जण मिळुन आपले कर्ज THALASSEMIA RAKSHITHA VOLUNTARY BLOOD CENTER या संस्थेतून करुन देणार आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर करार करावा लागेल, असे सांगितले. करारनामा करताना लाजीशेट्टी व सौजन्या बोरा यांनी त्यांना ५ लाख रुपये एका बँक खात्यावर टाकण्यास सांगितले. करारानामा झाल्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही व्हेरीफिकेशनसाठी तुमच्याकडे पुण्याला येऊ व त्यानंतर कर्जाची रक्कम तुम्हाला देऊ. त्यानंतर २९ मार्च २०२५ रोजी ते ५ जण पुण्यात आले. त्यावेळीही त्यांनी ५ लाख रुपये बँक खात्यावर पाठविण्यास सांगितले. तसेच १० लाख रुपये रोख दिले. त्याचबरोबर हैद्राबाद येथून पुण्यात येण्यासाठी विमानाच्या तिकीटाचे ४३ हजार ५८० रुपये त्यांनाच द्यावे लागले.
जिंदम यांच्या सांगण्यावरुन एप्रिल २०२४ पासून त्यांनी वेळोवेळी रोख स्वरुपात २५ लाख रुपये व २३ लाख ८५ लाख ५८० रुपये ऑनलाईन पाठवले. असे एकूण ४८ लाख ८३ हजार ५८० रुपये कर्ज मिळेल, या आशेने दिले. त्यानंतर मनोहर जिंदम व अशोक लाजीशेट्टी यांच्याकडे विचारणा केल्यावर तो काही ना काही कारण सांगून थोड्या दिवसात कर्ज मिळेल, असे सांगत. तेव्हा त्यांनी मनोहर जिंदम याला घेऊन हैद्राबादला गेले. लाजीशेट्टी व सौजन्या बोरा यांना भेटून कर्ज मिळेल नसेल तर माझे पैसे परत द्या, असे सांगितले. तेव्हा त्यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. ‘‘तुमको ज्यादा मस्ती आयी है क्या, काटके हैद्राबाद के किसी गली मे फेंक देंगे’’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा घाबरुन फिर्यादी पुण्याला परत आले. त्यानंतर आता त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी होऊन आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.
