Pune Crime News | कौटुंबिक वादातून कसबा पेठेत गोळीबार ! जखमी पतीवर उपचार सुरु
पुणे : Pune Crime News | कौटुंबिक वादातून कसबा पेठेत गोळीबाराची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यात पती जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
अभिजित शंकर शिंगोटे (वय ३५, रा. कसबा पेठ, काळभैरवनाथ मंदिराजवळ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित शिंगोटे व त्याच्या पत्नीमध्ये वाद विवाद होत होते. आज सकाळी ते घरात असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादातून अभिजित शिंगोटे याने गोळी झाडून घेतली. गोळी त्यांच्या खांद्याला लागली असून त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस त्यांच्या राहत्या घरी पोचले. तेथे रक्त सांडलेले दिसून येत होते. तसेच पिस्तुल व एक पुंगळी पोलिसांना आढळून आली. त्यांनी ती ताब्यात घेतली आहे.
अभिजित याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचे त्याची पत्नी सांगत आहे. अभिजितवर उपचार सुरू असल्याने त्याचा जबाब अद्याप नोंदविण्यात आलेला नाही. दोघेही पतीपत्नी वेगवेगळे सांगत असून फरासखाना पोलीस त्यांच्या म्हणण्याची सत्यता पडताळून पहात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने यांनी सांगितले.
