Pune ACB Trap Case | गर्भनिदान तपासणीच्या वेळी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्हा; 10 लाखांची लाच घेतल्यानंतर आणखी साडेपाच लाखांची लाच घेताना दोघा एजंटांना पकडले, दोन पोलीस हवालदार फरार
पुणे : Pune ACB Trap Case | गर्भनिदान तपासणी करत असल्याबाबत २५ लाखांची लाच देण्यास नकार दिल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके यांना खबर मिळाल्याचे दाखवुन बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीचे रॅकेट उघड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेथे पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्याने खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर १० लाखांची लाच स्वीकारुन आणखी साडेपाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघा खासगी व्यक्तींना अटक केली आहे. दोघे पोलीस हवालदार हे फरार झाले आहेत.
आबा सावळा वळकुंदे Aaba Savla Valkunde (वय ४८, रा. वळकुंदे मळा, ६१ फाटा, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि महादेव पंढरी माने Mahadev Pandhari Mane (वय ३९, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार अनिल महादेव शिंदे Anil Mahadev Shinde (नातेपुते पोलीस ठाणे), राहुल मारुती वाघ Rahul Maruti Wagh (रा. अकलुज सोसायटी, अकलुज ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. अनिल शिंदे हा अकलुज उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या कार्यालयात सध्या कर्तव्यार्थ आहे.
तक्रारदार यांच्याकडे अकलुज पोलीस ठाण्यात त्यांचा भाऊ व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदार अनिल शिंदे याने तक्रारदाराकडे स्वत: करीता व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या करीता २५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यास तक्रारदार यांनी नकार दिला.
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली होती. अकलुज परिसरातील महिलांचे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करण्यासाठी एजंट बाहेर गावी घेऊन जात आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी महिला व महिला पोलीस उपनिरीक्षक या दोघीना गर्भलिंग निदान चाचणीसाठी बनावट ग्राहक बनवले. एजंटाने त्यांना माळशिरस येथील एका फार्म हाऊसवर नेले. तेथे डॉ. महेश नंदकुमार खाडे (रा. पळशी, ता. माण) त्यांच्यासोबत आलेल्या महिलेचे मशीनद्वारे सोनोग्राफी केली. गर्भाचे लिंग कोणते हे डॉक्टराने हळु आवाजात कानात सांगितले. त्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक यांना सोनोग्राफीसाठी टेबलावर झोपा, असे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांनी डॉक्टरांना आम्ही पोलीस असल्याचे सांगितले, त्यावर डॉक्टराने शिवीगाळ करुन तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
जवळच बसलेला एजंट व डॉक्टराने चारचाकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केल्यावर गाडी त्यांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलीस जखमी झाले. डॉक्टराचे वडिल नंदकुमार खाडे हे आले व माझ्या फार्म हाऊसवर काय करता निघून जा नाहीतर तुम्हास बंदुकीच्या गोळीने मारुन टाकीन, अशी धमकी दिली. तेथील सर्व साहित्य घेऊन ते पळून गेले. डॉ. महेश नंदकुमार खाडे, त्याचा साथीदार संदिप माळवे, नंदकुमार खाडे व नंदकुमार खाडे याची पत्नी व इतर अशा ७ जणांविरोधात अकलुज पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्यासह कलम १०९, १३२, १२१ (१), १२७ (२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपी करण्यात आले आहे.
१८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल यांनी याने खासगी व्यक्ती आबा वळकुंदे याच्या मोबाईल फोनद्वारे तक्रारदाराशी संपर्क साधला. तुम्ही जर यापूर्वीच २५ लाख रुपये दिले असते तर गुन्हा दाखल झाला नसता़ आता त्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्याकरीता तसेच पीसी अँड पीएनडीटी या कायद्याची कलमे न लावण्याकरीता गुन्ह्याचे तपास अधिकारी डीवायएसपी संतोष वाळके यांच्याकरीता २५ लाख रुपये व काम झाल्यानंतर स्वत:साठी ५ लाख रुपये अशी लाचेची मागणी केली. अनिल शिंदे याने १० लाख रुपये लाच स्वीकारली. उर्वरित १५ लाख रुपयांची लाच मागणी केली. अशी तक्रार तक्रारदाराने २१ ऑगस्ट रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
या तक्रारीची २४ ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात अनिल शिंदे याने डीवायएसपी संतोष वाळके यांच्याकरीता २५ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. गुन्ह्यातील इतर दोन आरोपींसाठी यापूर्वी अनिल शिंदे याने १० लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान खासगी व्यक्ती आबा वळकुंदे व महादेव माने यांनी तक्रारदार यांचे आई वडिलांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व बी एन एस एस ३५ (३) अन्वये नोटीस देण्यास सांगतो, असे बोलून डीवायएसपी संतोष वाळके याच्याकरीता ५ लाख व वाघ पोलीस याचे करीता ५० हजार रुपये असे साडेपाच लाख रुपयांची मागणी केली. २८ ऑगस्ट रोजी फोन करुन घेऊन येण्यास सांगितले. त्यास पोलीस हवालदार राहुल मारुती वाघ याने प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आबा वळकुंदे व महादेव माने यांना माळशिरस येथील पिलीव रोडच्या पुलाखाली साडेपाच लाखांची लाच घेताना सापळा रचून पकडण्यात आले. दोघांना अटक करण्यात आली असून दोघे पोलीस फरार झाले आहेत.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक निता मिसाळ व सतिश वाळके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, सहा फौजदार राजेश बाटे, पोलीस हवालदार दगडु सोनावणे, पोलीस अंमलदार प्रवीण तावरे, अश्विन कुमकर यांनी ही कारवाई केली.
