Pune Crime News | रक्षाबंधनाची येरवडा पोलिसांची अनोखी भेट, नागरिकांचे हरवलेले 19 फोन केले परत
पुणे : Pune Crime News | नागरिकांचे हरवलेल्या फोनचा तपास करुन येरवडा पोलिसांनी १९ मोबाईल परत मिळविले. रक्षाबंधनाच्या दिवशी या नागरिकांना येरवडा पोलिसांनी एक अनोखी भेट दिली आहे.
केंद्र शासनाच्या सीईआयआर प्रणालीचा वापर करुन जास्तीतजास्त फोन शोधण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिले आहेत. येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार शैलेश वाबळे यांनी हरवलेल्या, चोरीस गेलेल्या मोबाईल संबंधीत डाटा तयार करुन त्याचा तांत्रिक तपास केला़ त्यानुसार नागरिकांचे हरविलेले, चोरीस गेलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये वापरात असल्याचे तांत्रिक माहितीवरुन निदर्शनास आले.
या मोबाईल फोन वापरकर्त्यांशी तसेच संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क करुन मे २०२६ ते ऑगस्ट २०२६ पर्यंत २ लाख २५ हजार रुपये किंमतीचे एकूण १९ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले आहे. यामध्ये परिमंडळ ४ कार्यालयातील पोलीस अंमलदार गोकुळ घुले यांनी मोबाईल टॉवर लोकेशन व सीडीआर पुरविण्याचे काम केले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी येरवडा पोलीस ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात हे मोबाईल मालकांना परत देण्यात आले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, गोकुळ घुले यांनी केले आहे.
