Pune Crime News | चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणार्‍या सोशल मीडिया इन्फ्लुएंजरवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणार्‍या दोघा इन्फ्लुएंजरवर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संतोष पंडीत याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘राजकारण एक्सप्रेस’ या सोशल मीडियावरील अकाऊंटवर चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा व्हिडिओ  २७ ऑगस्ट रोजी प्रसारित केला आहे.  ‘जनतेच्या प्रश्नाची उत्तरे नेते देत नाहीत. पाटील हे नेते त्यातीलच एक आहे’ असा मजकूर असलेला व्हिडिओमध्ये संतोष पंडित याने अवमानकारक भाषा वापरली आहे. या व्हिडिओमध्ये अश्लील, शिवराळ भाषेत सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करुन बदनामीकारक व अब्रुनुकसानी कारक मजकुर असलेला व्हिडिओ त्याच्या साथीदाराने व्हिडिओ शुटींग करुन सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे. नगरसेवक सुनिल पांडे यांच्या पाहण्यात नुकताच हा व्हिडिओ आला. त्यानंतर त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भारतीय न्याय संहिता कलम ३५६, २९६, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव तपास करत आहेत.

You may have missed