Pune Ganeshotsav | पुणे : चार बेस-चार टॉपपेक्षा अधिक साऊंड लावल्यास थेट गुन्हा; विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा कडक इशारा
पुणे : Pune Ganeshotsav | गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमसाठी चार बेस आणि चार टॉपची मर्यादा निश्चित करण्यावर जवळपास एकमत झाले आहे. या मर्यादेपेक्षा एकही बेस किंवा टॉप अधिक लावल्यास संबंधित गणेश मंडळाविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात येईल आणि नियमबाह्य साऊंड सिस्टीम जप्त केली जाईल, असा स्पष्ट इशारा पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
याशिवाय प्रेशरमीड आणि प्लाझ्मा उपकरणांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा यंदा चांगलाच चर्चेत आला आहे. कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात शहरातील विविध भागांतील नागरिकांनी आवाज उठविला असून, ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’ची मागणीही पुढे आली आहे.
ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच निवासी भागातील नागरिकांना मोठ्या आवाजाचा होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली आहे.
गणेश मंडळांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत साऊंड सिस्टीमच्या मर्यादेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार विसर्जन मिरवणुकीत चार बेस आणि चार टॉप ठेवण्यावर जवळपास एकमत झाले आहे.
मंडळांनी या मर्यादेपेक्षा अधिक उपकरणे लावली किंवा मिरवणूक सुरू झाल्यानंतर अतिरिक्त बेस अथवा टॉप जोडल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. नियमबाह्य साऊंड सिस्टीमही पोलिसांकडून जप्त केली जाणार आहे.
नियम पाळण्याची जबाबदारी गणेश मंडळांचीही
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होत असल्याने पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी गणेश मंडळांवरही असणार आहे. साऊंड सिस्टीमची निर्धारित मर्यादा पाळणे, प्रतिबंधित उपकरणांचा वापर टाळणे आणि ध्वनिप्रदूषणाच्या सर्व नियमांचे पालन करणे आयोजकांसाठी बंधनकारक राहणार आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित आयोजकांवर निश्चित करण्यात येईल, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींमध्ये बैठकीच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीतही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.
