Pune Crime News | पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षातून 7 पिस्तुले गेली चोरीला, पोलिसांना पत्ताच नाही; चोरीच्या पिस्तुलाने कचरा वेचकाने धमकाविल्याने आला प्रकार उघडकीस
पुणे : Pune Crime News | बंडगार्डन पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून एका कचरा वेचकाने तब्बल ७ पिस्तुले चोरली होती. परंतु, याचा पोलिसांना तब्बल दिवसभर पत्ताच लागला नाही. या चोरट्याने रात्री यातील एका पिस्तुलाने एकाला धमकाविल्यावर हा प्रकार उजेडात आला. रात्रभर शोध घेतल्यानंतर पहाटे ती ७ पिस्तुले पोलिसांना मिळाली.
राकेशकुमार संजयकुमार चिटेकर Rakeshkumar Sanjaykumar Chitekar (रा. फिरस्ता, मुळ रा. कलबर्गी कर्नाटक) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास सेंट्रल बिल्डिंग समोरील मुद्देमाल कक्षात घडला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, बंडगार्डन पोलिसांचा सेंट्रलबिल्डिंग समोरील इमारतीच्या एका खोलीत मुद्देमाल कक्ष आहे. आरोपी राकेशकुमार हा मुळचा कर्नाटक येथील कलबगीर्चा राहणारा आहे. पुण्यात तो फिरस्ता असून, त्याला दारुचे व्यसन आहे. शनिवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास तो कचरा गोळा करत -करत मुद्देमाल कक्षाच्या खोलीपर्यंत पोहचला. त्यानंतर पाठीमागील दरवाजा उचकटून आत गेला. तेथे त्याने सुरूवातीला काही बिअरच्या बाटल्या चोरी केल्या. बिअर पिला. त्यानंतर तेथील सात पिस्तले त्याने चोरी केली. दिवसभर ही पिस्तूले तो सोबत घेऊन फिरत होता. राकेशकुमार रात्री साडेदहा वाजता साधू वासवानी चौकातून बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या समोर आला. त्याने एकाला पिस्तूल दाखवून हँडसप म्हणाला. त्याने ही बाब पोलिसांना सांगितली.
पोलिस त्याला घेऊन पोलिस ठाण्यात गेले. चौकशीत त्याने ते पिस्तूल सेंट्रल बिल्डींगसमोरील इमारतीतीतून चोरी केल्याचे सांगितले. दरम्यान, पोलीस ठाण्यात हे पिस्तुल पहात असताना एका पोलिसाला त्यावर लिहिलेले बीएल हे अक्षर दिसून आले. हे पिस्तुल कोणत्यातरी गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केलेले होते, हे पोलिसांच्या लक्षात आले़. हे समजल्यावर बंडगार्डन पोलीस खडबडून जागे झाले. त्यांनी राकेशकुमारकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने आणखी काही पिस्तूले आपल्याकडे होती असे सांगितले. पोलिसांनी जेव्हा त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याची पिशवी त्याच ठिकाणी पडली होती. त्या पिशवीत ६ पिस्तूले होती. पोलिस जेव्हा ती पिशवी शोधायले गेले. त्यावेळी ती मिळून आली नाही. ती पिशवी दुसर्या एका फिरस्त्याने उचलून घेऊन गेला होता. सहा पिस्तुलाचा शोध रात्रभर बंडगार्डन पोलीस घेत होते. सीसीटीव्ही कॅमेर्यांची पाहणी केली असता, एक व्यक्ती ती पिशवी उचलून घेऊन जाताना दिसला. त्याचा माग काढत पोलिसांनी जनरल पोस्ट ऑफिसचा परिसर गाठला. एका झाडात ती पिशवी पोलिसांना मिळून आली. पिशवी उघडून पाहताच सहा पिस्तूले त्यामध्ये मिळून आली.
दरम्यान, पोलिसांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून राकेश चिटेकर याला अटक केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
