Pune News | 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अनिल कांबळे सेवानिवृत्त

Pune News | Anil Kamble retires after 35 years of long service

पुणे : Pune News | रावसाहेब पटवर्धन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि सेवाभावी शैक्षणिक सेवेनंतर अनिल लक्ष्मीबाई तात्याबा कांबळे हे नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त साने गुरुजी स्मारक येथील बॅ. नाथ पै सभागृहात सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद गोरे, मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर, पर्यवेक्षक जीवन इंगळे, प्राथमिक मुख्याध्यापिका मीना काटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व हितचिंतक उपस्थित होते. कांबळे यांच्या पत्नी अनुजा कांबळे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.

कांबळे यांनी आपल्या ३५ वर्षांच्या सेवाकाळात अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्यांची शिकवण देत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कांबळे यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीतील योगदानाचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दीर्घकाळ सहवास लाभलेल्या सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाझेदा मुलाणी यांनी केले. समारंभानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कांबळे यांच्या सेवापूर्तीचा हा सोहळा भावनिक वातावरणात पार पडला.

You may have missed