Chandrakant Patil | 16 महिन्यांच्या चिमुकलीच्या आयुष्यात पुन्हा भरणार ‘आवाज’; ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

Chandrakant Patil

सखी-सुखदा फाऊंडेशन, भाऊ फाउंडेशन आणि अ‍ॅड. तनिषा पाटील यांचे विशेष सहकार्य

पुणे : Chandrakant Patil | आई-वडिलांच्या कुशीत नुकतेच उमललेले १६ महिन्यांचे चिमुकले आयुष्य… डोळ्यांत जग पाहण्याची निरागसता, मात्र कानांपर्यंत जगाचा आवाज पोहोचत नव्हता. गंभीर श्रवणदोषामुळे या चिमुकलीच्या भवितव्यावर अंधाराची छाया निर्माण झाली होती. मात्र, माणुसकीच्या भावनेतून पुढे आलेल्या मदतीच्या हातामुळे तिच्या आयुष्यात आता आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

कोथरुड मधील केळेवाडी येथील रहिवासी मेघा बोडके यांनी १६ महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. जन्मानंतर करण्यात आलेल्या विविध वैद्यकीय तपासण्या आणि अहवालांच्या सखोल अभ्यासातून या बालिकेला गंभीर श्रवणदोष असल्याचे निदान झाले. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेळ न दवडता तज्ज्ञ डॉक्टरांनी कॉक्लियर इम्प्लांट (Cochlear Implant) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

मात्र, या शस्त्रक्रियेसाठी अपेक्षित असलेला तब्बल १० लाख रुपयांचा खर्च बोडके कुटुंबासाठी मोठे आर्थिक आव्हान ठरला. आपल्या चिमुकलीने एक दिवस आईचा आवाज ऐकावा, तिच्या हाकेला प्रतिसाद द्यावा, इतर मुलांप्रमाणे शिकावे आणि आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहावे, हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बोडके कुटुंबाची धडपड सुरू होती.

बोडके कुटुंबाची ही परिस्थिती सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या संचालिका श्रीमती स्मिता पाटील यांनी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दादांनी लोकसहभागातून या चिमुकलीच्या उपचारासाठी मदत उभी करण्याचा निर्णय घेतला. रक्षाबंधनानिमित्त आयोजित सखी-सुखदा फाऊंडेशनच्या कार्यक्रमातही त्यांनी या बालिकेच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन केले.

चंद्रकांतदादांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशन, भाऊ फाउंडेशन तसेच अ‍ॅड. तनिषा समीर पाटील यांनी बालिकेच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. या सामूहिक प्रयत्नांतून तिच्या कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.

आज ही आर्थिक मदत बालिकेच्या उपचारासाठी सुपूर्द करण्यात आली. या मदतीमागे केवळ आर्थिक हातभार नसून, एका चिमुकलीला आवाजांच्या जगात घेऊन जाण्याची, तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवण्याची आणि तिच्या भविष्याला नवी दिशा देण्याची संवेदनशील भावना आहे.

आज ती कदाचित शब्द ऐकू शकत नसेल… पण तिच्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. हीच माणुसकीची सर्वात सुंदर जाणीव आहे. कोथरुडचे आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि सखी-सुखदा फाऊंडेशन, भाऊ फाउंडेशन आणि अ‍ॅड. तनिषा पाटील यांच्या मदतीमुळे तिच्यावर आवश्यक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया होऊन तिला ऐकण्याची, बोलण्याची, शिकण्याची आणि आत्मविश्वासाने उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी मिळाली आहे.

You may have missed