Pune Ganeshotsav | पुणे : शहरात ‘चार बेस, चार टॉप’चा परिणाम; उपनगरांत मात्र DJ चा दणदणाट
पुणे : Pune Ganeshotsav | डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला पुणेकरांचा वाढता विरोध, पोलिसांनी घालून दिलेली मर्यादा आणि काही मंडळांनी घेतलेला डीजेमुक्त उत्सवाचा निर्णय यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात ध्वनीची तीव्रता काही प्रमाणात नियंत्रणात राहिली. मात्र, उपनगरांत ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र दिसून आले.
उत्सवापूर्वी पुणे पोलिसांनी मंडळांसाठी ‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा निश्चित केली होती. त्यासोबतच निर्धारित डेसिबल मर्यादेचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
मध्यवर्ती भागातील अनेक मंडळांनी या नियमांचे पालन केले. मात्र, उपनगरांतील काही मंडळांनी मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेची ध्वनिव्यवस्था वापरल्याचे आढळून आल्याने काही ठिकाणी पोलिसांनी ध्वनिवर्धक जप्त केले.
पुणे पोलिसांनी शहरातील सुमारे 1,100 दहीहंडी मंडळांच्या ठिकाणी ध्वनीची पातळी नोंदवली आहे. या नोंदींची तपासणी करून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
बिबवेवाडी परिसरात मोठ्या आवाजात साउंड वाजवून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी एका मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ‘DJ विरोधी पुणेकर मंचा’ने शहरातील 59 ठिकाणी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन झाल्याचा दावा केला आहे. त्यापैकी 33 ठिकाणी आवाजाची तीव्रता 100 डेसिबलपेक्षा अधिक असल्याचे मंचाने म्हटले आहे.
‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा पाळली तरी निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक आवाज झाल्यास संबंधित मंडळावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
