Pune Crime News | कोंढवा (पुणे) : पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; तरुण गंभीर जखमी
पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने आरडाओरडा करत दहशत माजवत गोळीबार करुन तरुणाला गंभीर जखमी केले आहे. कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सौरभ अनिल त्रिंबके (वय २७, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डाव्या पायाच्या पोटरीतून गोळी आरपार घुसून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दादु भालेराव, चिक्क्या ऊर्फ आरोह सनी पिल्ले, जाम्बा व इतर ८ ते १० जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील लक्ष्मीनगर मधील गल्ली क्रमांक ६ येथे रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ त्रिंबके हा इंटेरियर डेकोरेटर म्हणून काम करतो. तो रविवारी रात्री गणपती मंडपाचे बांधकामाजवळ मित्र बंटी पवार याच्याबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी त्याचा मित्र सागर पंधरकर याच्याशी झालेल्या वादाच्या कारणावरुन चिक्या पिल्ले, दादू भालेराव, जाम्बा व इतर ८ ते १० जण आले. दादू भालेराव याने त्याच्याकडील पिस्टलातून सौरभच्या दिशेने गोळीबार केला. ही गोळी सौरभ याच्या डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार गेली. त्यामुळे सौरभ जखमी झाला. या टोळक्याने आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. त्यामुळे लोक घाबरुन पळून गेले. हे टोळके पळून गेल्यावर सौरभ याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
