Pune Crime News | पुणे : 100 पेक्षा अधिक गुन्हे करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास डोणजे फाटा परिसरातून अटक
पुणे: Pune Crime News | पुणे गुन्हे शाखा युनिट 2 ने वाहनचोरीच्या गुन्ह्यात सुमारे दोन वर्षांपासून पाहिजे असलेल्या 60 वर्षीय आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध गेल्या तीन दशकांत 100 हून अधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजू बाबुराव जावळकर असे असून तो डोणजे फाटा, पुणे येथील रहिवासी आहे.
गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 2 कडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती. याचदरम्यान 8 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे यांना गोपनीय माहिती मिळाली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 2024 मध्ये भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल वाहनचोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला राजू जावळकर डोणजे फाटा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती.
डोणजे परिसरातून शिताफीने ताब्यात
ही माहिती गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने डोणजे परिसरात कारवाई करून जावळकरला ताब्यात घेतले.
यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, जावळकर हा वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील अभिलेखावरील आरोपी असून, गेल्या 30 वर्षांत पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, अहिल्यानगर आणि इतर भागांत त्याच्याविरुद्ध 100 पेक्षा अधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहा. पोलीस आयुक्त शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सपोनि स्वप्नील लोंखडे, मपोउप तेजश्री पवार, पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, शंकर नेवसे, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, उज्वल मोकाशी, कुंदन शिंदे, महेश मंडलिक, संतोष टकले, विजय पवार, शंकर कुंभार, संदिप शिर्के, नागनाथ राख, ओमकार कुंभार, साधना ताम्हाणे, विदया शिंदेव विनायक यांच्या पथकाने केली आहे.
