Pune Crime News | विवाहाच्या आमिषाने उच्चशिक्षित तरुणीची 28 लाखांची फसवणूक; सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे: Pune Crime News | विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका उच्चशिक्षित तरुणीची तब्बल २७ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने विवाहासाठी एका संकेतस्थळावर नोंदणी केली होती. याच माध्यमातून आरोपीने तिच्याशी संपर्क साधला.
आरोपीने आपण विवाहासाठी इच्छुक असल्याचे सांगत तरुणीचा विश्वास संपादन केला. तसेच आपण तुर्कीतील एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी केली. त्यानंतर तो नियमितपणे तरुणीच्या संपर्कात राहू लागला आणि विवाहाचे आमिष दाखवत तिला विश्वासात घेतले.
काही दिवसांनी आरोपीने तुर्कीतील आपले बँक खाते काही कारणांमुळे गोठविण्यात आल्याचे सांगितले. तातडीने पैशांची गरज असल्याचे भासवून त्याने तरुणीकडे आर्थिक मदत मागितली.
आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणीने गेल्या पाच ते सहा महिन्यांत वेळोवेळी त्याने दिलेल्या बँक खात्यांमध्ये एकूण २७ लाख ९४ हजार रुपये पाठविले.
मात्र, पैसे मिळाल्यानंतर आरोपीने आपला मोबाइल क्रमांक बंद केला. तरुणीने त्याच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक रेवले पुढील तपास करत आहेत.
