Pune Crime News | दारूच्या नशेत हॉटेलमध्ये शिरून तरुणीने हॉटेल कामगाराला मारहाण करून पायाचा घेतला चावा; बाटल्या फोडल्या, टेबलाची तोडफोड करून केले नुकसान
पुणे : Pune Crime News | दारूच्या नशेत हॉटेलमध्ये येऊन ग्राहक, मॅनेजरला तरुणीने शिवीगाळ करून हॉटेल कामगाराला मारहाण करून पायाचा चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणीने हॉटेलमधील बाटल्या फोडून टेबल, वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले आहे.
याबाबत धनंजय रामभाऊ देशमाने (वय ४२, माळवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सुनीता बाळू हांडे Sunita Balu Hande (वय ३०, रा. उमरेड, जि. सोलापूर) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना माळवाडी येथील डी पी रोडवरील सिद्धेश्वर हॉटेल येथे १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सव्वा दहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिद्धेश्वर हॉटेलमध्ये कामाला आहेत. ते शनिवारी रात्री काम करीत होते. सुनीता हांडे या मूळच्या सोलापूरच्या आहेत. पुण्यात त्या नोकरी करत आहेत. शनिवारी रात्री त्या दारूच्या नशेत हॉटेलमध्ये आल्या. तेथील फॅमिली रुम मध्ये त्या बसल्या होत्या. त्यांचे हॉटेलमधील मॅनेजर रतन दास यांच्याबरोबर वाद झाला. त्यातून तिने त्यांना व इतर ग्राहकांना शिवीगाळ केली. आरडा ओरड झाल्याने फिर्यादी धनंजय देशमाने हे तेथे गेले. ते या तरुणीला समजावून सांगत होते. त्यावेळी तिने हॉटेलमधील काचेच्या बाटल्या फोडल्या. त्यात तिचा तोल जाऊन ती खाली पडली. तेव्हा तिने शेजारी उभ्या असलेल्या देशमाने यांच्या उजव्या पायाचा करकचून चावा घेऊन जखमी केले. हॉटेलमधील टेबल व इतर वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले.
या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस हॉटेलमध्ये पोहचले. त्यांनी या तरुणीला ताब्यात घेतले. ससून रुग्णालयात नेऊन तिचे मेडिकल केले आहे. फिर्यादी यांचे ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांना इंजेक्शन देण्यात आले आहे. पोलीस हवालदार बाळाजी वणवे तपास करीत आहेत.
